'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या नवऱ्याला पसंत नव्हता तिचा हिरोंसोबत ऑनस्क्रीन रोमांस, अभिनेत्रीनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 17:49 IST2022-05-03T17:48:34+5:302022-05-03T17:49:01+5:30
Bhagyashree : अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, सासरचे मंडळी तिचे स्टारडम कधी समजू शकले नाहीत. कारण त्यांचा सिनेइंडस्ट्रीशी काहीही संबंध नव्हता.

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीच्या नवऱ्याला पसंत नव्हता तिचा हिरोंसोबत ऑनस्क्रीन रोमांस, अभिनेत्रीनेच केला खुलासा
अभिनेत्री भाग्यश्री(Bhagyashree)ने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती, पण सलमान खान (Salman Khan) स्टारर 'मैंने प्यार किया' (Maine Pyar Kiya) या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. भाग्यश्रीला चित्रपटात घेण्यासाठी प्रत्येक चित्रपट निर्माते आतुर झाले. मात्र या चित्रपटाच्या यशादरम्यानच भाग्यश्रीने अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हिट डेब्यूनंतर एका वर्षाने भाग्यश्री हिमालय दासानीसोबत सेटल झाली. लग्नानंतर भाग्यश्रीला एक वेगळाच संसार मिळाला. चित्रपटांशी काहीही संबंध नसलेले जग. अशा परिस्थितीत भाग्यश्री लग्नानंतर गृहिणी बनली आणि सामान्य गृहिणी करते ती सर्व कामे तिने केली.
भाग्यश्रीने अलिकडेच 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत लग्नानंतरच्या आयुष्याविषयी सांगितले. तिने सांगितले की, तिचे बाहेरचे जग घरातील जगापेक्षा खूप वेगळे होते. घरात पाऊल ठेवताच ती सर्वसामान्य गृहिणी बनत असे. भाग्यश्रीने तिच्या पती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी स्वतःला बदलले. भाग्यश्री म्हणाली की तिचे सासरचे लोक तिचे स्टारडम कधीच समजू शकले नाहीत कारण त्यांचा फिल्मी जगाशी काहीही संबंध नाही.
भाग्यश्री म्हणाली, मी अशा घरात लग्न केले ज्याचा चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळेच बाहेरच्या जगात माझं आयुष्य कसं आहे हे त्यांना समजलं नाही. मी काम करून आल्यानंतर घरात पाऊल ठेवताच माझे आयुष्य बदलून जायचे. तेव्हा मी 'भाग्यश्री' अभिनेत्री नव्हते. मला इतर गृहिणींप्रमाणे अनेक गोष्टी कराव्या लागायच्या आणि त्या सर्व गोष्टी मी करायचे.
त्याच मुलाखतीत भाग्यश्रीने खुलासा केला की तिचा पती हिमालय इतर अभिनेत्यांसोबत रोमान्स करताना पाहून अस्वस्थ व्हायचा. भाग्यश्रीच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा तिच्याबाबतीत खूप पझेसिव्ह होता. त्यावेळी ज्या प्रकारचे चित्रपट बनवले जात होते ते त्याला आवडत नव्हते. भाग्यश्रीच्या म्हणण्यानुसार, त्या चित्रपटांमध्ये रोमान्स होता आणि मला दुसऱ्यासोबत रोमान्स करताना पाहून नवरा अस्वस्थ व्हायचा. त्यामुळे मी करिअरपेक्षा नात्याला प्राधान्य दिले.