पैशासाठी मांत्रिकाचा सल्ला, फायनान्सरला खाऊ घातलं "मानवी मांस" घातलेलं पान अन् मग...; महेश भट यांचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:27 IST2025-10-08T15:21:44+5:302025-10-08T15:27:21+5:30
फायनान्सरकडून पैसे मिळण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतल्याचा आणि त्याच्या सांगण्यावरुन फायनान्सरला मानवी मांस खाऊ घातल्याचा धक्कादायक खुलासा महेश भट यांनी त्यांच्या लेकीच्या पॉडकास्टमध्ये केला आहे.

पैशासाठी मांत्रिकाचा सल्ला, फायनान्सरला खाऊ घातलं "मानवी मांस" घातलेलं पान अन् मग...; महेश भट यांचा धक्कादायक खुलासा
महेश भट हे बॉलिवूडमधील मोठं नाव आहे. ते एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी बॉलिवूडला दिले आहेत. पण, सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये करियर करत असताना महेश भट यांनादेखील इतरांसारखाच स्ट्रगल करावा लागला. सिनेमाची निर्मिती करण्यासाठी महेश भट यांना पैसे हवे होते. फायनान्सरकडून पैसे मिळण्यासाठी मांत्रिकाची मदत घेतल्याचा आणि त्याच्या सांगण्यावरुन फायनान्सरला मानवी मांस खाऊ घातल्याचा धक्कादायक खुलासा महेश भट यांनी त्यांच्या लेकीच्या पॉडकास्टमध्ये केला आहे.
महेश भट यांनी पूजा भटच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील सुरुवातीचा स्ट्रगलिंग काळ सांगितला. ते म्हणाले, "मी २०व्या वर्षी चित्रपट निर्माता म्हणून स्ट्रगल करत होतो. माझा मित्र अरुण देसाईदेखील माझ्यासारखाच स्ट्रगलर होता. अरुणने मला बिहारमधील गयामध्ये एका फायनान्सरला भेटण्याचा सल्ला दिला होता. पण, बिहारला जाताना वाराणसीमधून आम्ही जाणार होतो. कारण, अरुणला वाराणसीत त्याच्या गुरूला(मांत्रिक) भेटायचं होतं. आम्ही त्याला भेटायला गेलो. अनेक गरीब लोक रांग लावून बसले होते. तो एक मांत्रिक होता आणि तरूण दिसत होता. हातात रमची बॉटल घेऊन तो डान्स करत होता".
"त्या मांत्रिकाने आम्हाला दुसऱ्या दिवशी बोलवलं. त्याने एक तुकडा घेतला आणि पुडीत बांधला. यात माणसाचं मांस आहे जे घाटावरुन आणलं आहे, असं तो म्हणाला. हे मासं फायनान्सरला खाऊ घाला मग तो तुम्हाला पैसे देईल, असा उपाय त्याने सांगितला होता. ते मासं घेऊन आम्ही निघालो आणि त्याला कसं खाऊ घालायचं असा विचार करत होतो. मग पानातून हे मांस त्याला खाऊ घालायचं असं ठरलं. आम्ही त्याला भेटायला गेलो आणि त्याला पान खायला दिलं. त्याने ते पान तोंडात टाकलं. आम्हाला वाटलं की आम्ही जिंकलो. आता आयुष्य बदलेल असा विचार करून मी तिथून निघालो. पण, नंतर त्या फायनान्सरने कोणतीच मदत केली नाही", असं महेश भट म्हणाले.