चुलत भावाने दाखवलं माधुरी दीक्षितचं कोकणातील घर, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:33 IST2025-09-26T10:32:45+5:302025-09-26T10:33:11+5:30
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचं गाव कोणतं?

चुलत भावाने दाखवलं माधुरी दीक्षितचं कोकणातील घर, पाहा व्हिडीओ
Madhuri Dixit Village In Konkan: बॉलिवूडची 'धकधक गर्ल' आणि सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षितची लोकप्रियता जगभर आहे. मुंबईत लहानाची मोठी झालेली आणि बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री मूळची कोकणकन्या आहे. माधुरीच्या कोकणातील गावाबाबत आणि तिच्या बालपणीच्या आठवणींबद्दल तिच्या चुलत भावाने नुकतीच माहिती दिली.
माधुरी दीक्षितचे गाव कोकणातील देवगड तालुक्यात 'पडेल' या ठिकाणी आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राहिद सोलकर याने नुकतीच या गावाला भेट दिली आणि माधुरीचे चुलत भाऊ विकास दीक्षित यांच्याशी संवाद साधला. माधुरीने 'धकधक गर्ल' म्हणून जगभर नाव कमावलं असलं, तरी तिच्या गावच्या लोकांना तिचा खूप अभिमान आहे. तिच्या चुलत भावाने स्पष्टपणे सांगितलं की, माधुरी सुपरस्टार झाली आणि तिने आमच्या कोकणाचं नाव मोठं केलं, याचा आम्हाला खूप आनंद आहे.
माधुरीचे चुलत भाऊ विकास दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९५० च्या दशकात माधुरीचे आजोबा रामचंद्र दीक्षित हे पडेल गाव सोडून मुंबईला व्यवसायानिमित्त गेले. त्यांनी तिथे शेअर ब्रोकर म्हणून काम सुरू केलं आणि नंतर दादरमध्ये शिवाजी पार्कसमोर घर घेतलं. आजही त्याठिकाणी दीक्षित बंगला आहे. याच बंगल्यात माधुरीचा जन्म झाला. रामचंद्र दीक्षित यांचे चिरंजीव शंकर यांची माधुरी ही मुलगी आहे.
दरम्यान, माधुरी दीक्षितने निर्मिती केलेल्या 'पंचक' सिनेमाचे शूटिंग कोकणात झाले होते. यावेळी माधुरीने स्वतः तिच्या गावच्या आणि बालपणीच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या होत्या. अभिनेत्री म्हणाली होती, "माझी आजी-पणजी सगळे कोकणामध्ये होते. त्यामुळे आम्ही लहानपणी त्यांना भेटायला कोकणात जायचो. माझ्याबरोबर माझी चुलत भावंडं सुद्धा गावी यायची. झाडावर चढायचं, आंबे खायचे…या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत. आम्हा सगळ्या भावंडांचं वय तेव्हा ८ ते ९ वर्ष होतं. त्यावेळी आमच्या गावी एक मोठा झोका होता. त्यावर आम्ही खेळत बसायचो. आमचे आजोबा खूप कडक शिस्तीचे होते. त्यामुळे त्यांचा आवाज ऐकला की आम्ही सगळे पळून जायचो. त्यांना बघून पळून जाण्याचं कारण म्हणजे, आजोबा आल्यावर आम्हाला सगळ्यांना कामाला लावायचे. हे काय झोके घेत बसलात…चला शेण सारवायला लागा असं सांगायचे. माझे आजोबा सगळ्यांकडून अंगणात शेण सारवून घ्यायचे".