LMOTY 2024: अभिनेता रणबीर कपूरला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 07:52 PM2024-02-15T19:52:15+5:302024-02-15T19:54:34+5:30

आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे आज अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता रणबीर कपूरला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.

LMOTY 2024 bollywood actor Ranbir Kapoor awarded Lokmat Maharashtrian of the Year in entertainment field | LMOTY 2024: अभिनेता रणबीर कपूरला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

LMOTY 2024: अभिनेता रणबीर कपूरला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'. महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा हा सन्मान सोहळा. लोकसेवा-समाजसेवा, कृषी, शिक्षण, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, राजकारण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी पुरस्काराने गौरवण्यात येतं. मनोरंजन क्षेत्रातील योगदानाबद्दल बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ पाहता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या हस्ते रणबीरला सम्मानित करण्यात आले.  

रणबीर कपूरला बॉलिवूडमध्ये १७ वर्ष झाली आहेत. २००७ साली आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' सिनेमातून त्याने पदार्पण केले. सध्या रणबीर Animal सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाने ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या सिनेमात त्याने रणविजय सिंहची भूमिका साकारली. कधीही न पाहिलेल्या अशा अँग्री भूमिकेत तो दिसला. त्याच्या एन्ट्रीवर तर थिएटरमध्ये शिट्ट्या वाजल्या. रणबीर कपूरच्या अभिनय कौशल्याचं नेहमीच कौतुक होतं. त्याला घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला आहे. त्याचे वडील दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याकडूनच त्याला अभिनयाची प्रेरणा मिळाली. तर आई नीतू कपूर या देखील उत्कृष्ट अभिनेत्री आहेत.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर रणबीरने सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला, "आयुष्यात माझे तीन लक्ष्य आहेत. एक चांगलं काम करा. यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयश मनाला लावून घेऊ नका. दुसरं चांगला माणूस बना आणि तिसरं चांगला नागरिक बना. हेच मी शिकलो आहे आणि तसं बनायचा प्रयत्न करत आहे. मुंबईकर असल्याचा मला गर्व आहे."

रणबीर कपूरचे आगामी 'ब्रह्मास्त्र 2', 'अॅनिमल पार्क', 'लव्ह अँड वॉर' हे चित्रपटही येणार आहेत. तर नितेश तिवारींच्या आगामी 'रामायण' सिनेमात तो प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. 

Web Title: LMOTY 2024 bollywood actor Ranbir Kapoor awarded Lokmat Maharashtrian of the Year in entertainment field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.