अरुण गोविल नव्हे, हे आहेत पडद्यावरचा पहिले 'राम'; 1917 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 11:01 AM2024-01-22T11:01:24+5:302024-01-22T11:02:42+5:30

Anna salunkhe: या अभिनेत्याने एकाच सिनेमात राम आणि सीता या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या.

lanka-dahan-ramayan-ram-mandir-movies-list-hanuman-film-facts-history | अरुण गोविल नव्हे, हे आहेत पडद्यावरचा पहिले 'राम'; 1917 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा

अरुण गोविल नव्हे, हे आहेत पडद्यावरचा पहिले 'राम'; 1917 मध्ये रिलीज झाला होता सिनेमा

अयोध्येतील राम मंदिरात आज (दि.२२) रामलला विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे सध्या देशभरात राममय वातावरण निर्माण झालं आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण रामभक्तीत लीन झाला आहे. विशेष म्हणजे कलाविश्वात प्रभू रामांवर आधारित अनेक सिनेमा, मालिकांची निर्मिती झाली आहे. यात अभिनेता अरुण गोविल (arun govil)  यांनी 'रामायण' मालिकेत साकारलेली रामाची भूमिका संपूर्ण देशवासियांच्या लक्षात राहिली. परंतु, पडद्यावर रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल पहिले कलाकार नसून त्यांच्यापूर्वी एका लोकप्रिय अभिनेत्याने प्रभू रामाची भूमिका साकारली आहे.

छोट्या पडद्यावर रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका तुफान गाजली. १९८७ चा काळ गाजवणाऱ्या या मालिकेची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळातही ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली. या मालिकेत अभिनेता अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमध्ये ते इतके समरसून गेले होते की प्रेक्षकांनी त्यांना खऱ्या आयुष्यातही श्रीराम समजू लागले होते. इतकंच कशाला आज त्यांच्याकडे प्रभू राम म्हणूनच पाहिलं जातं. मात्र, पडद्यावर श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे पहिले कलाकार नाहीत. त्यांच्या पूर्वी एका अभिनेत्याने ही भूमिका साकारली आहे. तर अन्य एका दुसऱ्या अभिनेत्याने तब्बल 8 वेळा रामाची भूमिका साकारली आहे. मात्र, हे फारसं कोणाला ठावूक नाही.

रामायण या मालिकेपूर्वी 1917 मध्ये प्रभू रामावर आधारित 'लंका दहन' हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज होऊन आता 107 वर्ष झाली आहेत. या सिनेमात त्याकाळी 10  दिवसांत 35 हजार रुपयांची कमाई केली होती. लंका दहन या मुकपटात अभिनेता अण्णा साळुंके (anna salunkhe)यांनीच राम आणि सीता या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. हा सिनेमा त्याकाळी इतका गाजला की लोकांनी सिनेमागृहाच्या बाहेर चक्क रांगा लावल्या होत्या. इतकंच नाही तर लोकांनी श्री रामाचा सिनेमा पाहायचा म्हणून त्यांच्या चप्पलाही थिएटरच्या बाहेर काढल्या होत्या.

या अभिनेत्याने तर चक्क ८ वेळा साकारली रामाची भूमिका

1940 च्या आसपास बोलपटांची निर्मिती झाली. त्यावेळी एका अभिनेत्याला रामाच्या रुपांत प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यामुळे या अभिनेत्याने १-२ नव्हे तर तब्बल ८ वेळा रामाची भूमिका साकारली. हा अभिनेता होता प्रेम अदीब. त्याकाळातील टॉप अभिनेत्यांच्या यादीत त्याचा समावेश केला जायचा. प्रेम अदीब याने २५ वर्षांच्या करिअरमध्ये तब्बल ६० सिनेमांमध्ये काम केलं. यात ८ वेळा त्याच्या वाट्याला रामाची भूमिका आली. 

'भरत मिलाप', 'राम राज्य', 'राम बाण', 'राम विवाह', 'राम नवमी', 'राम हनुमान युद्ध', 'राम लक्ष्मण', 'राम भक्त बिभिष्ण' या सिनेमात प्रेम अदीब याने रामाची भूमिका साकारली होती. दरम्यान, आजवरच्या फिल्मी इतिहासात राम आणि रामायण यांच्यावर आधारित साधारणपणे ५० सिनेमा आणि २० मालिकांची निर्मिती झाल्याचं दिसून येतं. अलिकडेच बॉलिवूडमध्ये आदिपुरुष हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा गाजला नाही. मात्र, साऊथ इंडस्ट्रीत नुकताच रिलीज झालेला हनुमान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड मोडतांना दिसत आहे.

Web Title: lanka-dahan-ramayan-ram-mandir-movies-list-hanuman-film-facts-history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.