"प्रेमात मृत्यू आहे पण मुक्ती नाही...", 'तेरे इश्क में' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, क्रिती-धनुषच्या केमिस्ट्रीने जिंकली मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:28 IST2025-11-18T16:28:10+5:302025-11-18T16:28:52+5:30
'तेरे इश्क में'मध्ये धनुष आणि क्रिती सेनन ही नवी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

"प्रेमात मृत्यू आहे पण मुक्ती नाही...", 'तेरे इश्क में' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, क्रिती-धनुषच्या केमिस्ट्रीने जिंकली मनं
दिग्दर्शक आनंद एल राय आणि अभिनेता धनुष ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'रांझणा'नंतर आनंद राय धनुषसोबत नवा सिनेमा घेऊन सज्ज आहेत. 'तेरे इश्क में' असं या सिनेमाचं नाव असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'तेरे इश्क में'मध्ये धनुष आणि क्रिती सेनन ही नवी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
'तेरे इश्क में' ट्रेलरमध्ये धनुष आणि क्रिती सेनन यांची दमदार केमिस्ट्री दिसत आहे. ही एक साधी प्रेमकथा नाही, हे ट्रेलर पाहून लक्षात येतं. प्रेमात फसलेल्या एका वेड्या प्रियकराच्या भावना ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला धनुषची एन्ट्री होते. हवाई दलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत धनुष दिसत आहे. तर खूर्चीत क्रिती बसल्याचं दिसत आहे. दोघेही एकमेकांकडे बघताच फ्लॅशबॅक सुरू होतो आणि दोघांचं नेमकं नातं काय याचा उलगडा ट्रेलरमध्ये होतो आहे. पण, त्यांच्या लव्हस्टोरीत पुढे काय घडणार, हे पाहणं तितकंच रोमांचक असणार आहे. "प्यार में पड गया तो दिल्ली फूंक दूंगा" आणि "प्रेम में मृत्यु है...मुक्ति नहीं" यांसारखे संवाद लक्ष वेधून घेत आहेत. या सिनेमात धनुष लेफ्टनंट कर्नल शंकरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर क्रिती मुक्ती या व्यक्तिरेखेत आहे.
या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी ए.आर. रहमान यांनी सांभाळली असून, गाणी इर्शाद कामिल यांनी लिहिली आहेत. या तीव्र प्रेमकथेमुळे हा ट्रेलर सध्या चर्चेत आहे.हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.