मृत्यूच्या २४ तास आधी किशोर कुमार यांनी रेकॉर्ड केलं होतं 'हे' गाणं; आजही युट्यूबवर तुफान लोकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:13 IST2026-02-26T10:12:25+5:302026-02-26T10:13:08+5:30
किशोर यांनी त्यांच्या निधनाच्या अवघ्या २४ तास आधी आपले शेवटचे गाणे रेकॉर्ड केले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

मृत्यूच्या २४ तास आधी किशोर कुमार यांनी रेकॉर्ड केलं होतं 'हे' गाणं; आजही युट्यूबवर तुफान लोकप्रिय
गायक किशोर कुमार जिवंत नसले तरी आजही चाहत्यांच्या मनात त्यांची क्रेझ कायम आहे. आजही त्यांची गाणी, त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ताजे आहेत. किशोर कुमार यांनी आपल्या आवाजाने कित्येक पिढ्यांना वेड लावले. किशोर यांनी त्यांच्या निधनाच्या अवघ्या २४ तास आधी आपले शेवटचे गाणे रेकॉर्ड केले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ३९ वर्षांनंतरही हे गाणे युट्यूबवर तुफान हिट ठरत आहे.
किशोर कुमार यांचे १३ ऑक्टोबर १९८७ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या दुर्दैवी दिवसाच्या बरोबर एक दिवस आधी म्हणजेच १२ ऑक्टोबर १९८७ रोजी त्यांनी आयुष्यातील शेवटचे गाणे रेकॉर्ड केले होते. हे गाणे 'वक्त की आवाज' या चित्रपटातील असून त्याचे बोल आहेत "गुरु गुरु आ जाओ".हे गाणे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
किशोर कुमार यांनी हे गाणे आशा भोसले यांच्यासोबत गायले होते. प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांनी या गाण्याला संगीत दिले होते. या गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चित्रपटसृष्टीने आपला हा अनमोल हिरा कायमचा गमावला.
युट्यूबवर २५ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज!
३९ वर्षांपूर्वीचे हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. 'शेमारू'च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर हे गाणे उपलब्ध असून, आतापर्यंत याला २५ दशलक्ष (२.५ कोटी) हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. किशोर कुमार यांच्या आवाजातील तीच जादू आजही चाहत्यांना या गाण्याकडे खेचून आणते. आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत किशोर कुमार यांनी हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये अंदाजे १६,००० गाण्यांना आपला आवाज दिला होता.