मी आणि माझी मिनी! कियारा अडवाणीने लेकीला दाखवला मॅगझिनमधील फोटो, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 09:54 IST2026-01-06T09:46:28+5:302026-01-06T09:54:59+5:30
अभिनेत्री कियारा अडवाणीने पहिल्यांदाच सोशल मीडियावर लेकीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे

मी आणि माझी मिनी! कियारा अडवाणीने लेकीला दाखवला मॅगझिनमधील फोटो, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी काही महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिला असून ती सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. जुलै २०२५ मध्ये कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या लेकीचे स्वागत केले, जिचे नाव त्यांनी 'सारायाह' (Saraayah) असे ठेवले आहे. नुकताच कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती सारायाहसोबत गोड गप्पा मारताना दिसत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
कियाराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कियारा तिचा फोटो असलेल्या एका मॅगझीनची पानं उलटताना दिसत आहे. जेव्हा त्या मासिकात कियाराचा स्वतःचा फोटो येतो, तेव्हा ती आपल्या लेकीला विचारते, "तुला ममाचं मॅगझीन वाचायचं आहे का? बघूया ममा कुठे आहे! ही बघ, ही कोण आहे? ममा?" जरी या व्हिडिओमध्ये कियाराने सारायाहचा चेहरा दाखवलेला नसला, तरी सारायाहचे चिमुकले हात आणि गोड आवाज ऐकून चाहते आनंदी झाले आहेत. कियाराने या पोस्टला "मी आणि माझी छोटी मिनी सोमवारी मॅगझीन वाचताना आनंद घेत आहोत" असे कॅप्शन दिले आहे.

मुलीच्या प्रायव्हसीबद्दल काळजी
कियारा आणि सिद्धार्थने सुरुवातीपासूनच त्यांच्या मुलीची प्रायव्हसी जपली आहे. त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे मुलीचे नाव जाहीर केले होते. नुकत्याच झालेल्या ख्रिसमसच्या वेळीही त्यांनी सारायाहचा एक फोटो शेअर केला होता, परंतु त्यातही तिचा चेहरा स्पष्टपणे दाखवला नव्हता. सिद्धार्थ मल्होत्राने एका मुलाखतीत सांगितले होते की, मुलीच्या जन्मानंतर त्याचे जग पूर्णपणे बदलले आहे आणि आता त्याच्या घरात तीच 'सुपरस्टार' आहे.