विराट कोहलीला 'कॉफी विथ करण'मध्ये 'नो एन्ट्री'; सहा वर्षांपूर्वीच्या 'त्या' वादामुळे करण जोहरचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 12:37 IST2025-11-09T12:02:45+5:302025-11-09T12:37:20+5:30
'कॉफी विथ करण'मध्ये विराट कोहलीला का नाही बोलावलं? करण जोहर म्हणाला...

विराट कोहलीला 'कॉफी विथ करण'मध्ये 'नो एन्ट्री'; सहा वर्षांपूर्वीच्या 'त्या' वादामुळे करण जोहरचा मोठा निर्णय
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे करण जोहर. दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आजवर काम केलं. करणने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याचा 'कॉफी विथ करण' या शोचे तर जगभरात चाहते आहेत. आतापर्यंत या शोचे ८ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शोमध्ये अनेक मोठे स्टार्स त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दलचे खुलासे करतात. मात्र, आता करण जोहरने एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
नुकतंच करणने 'मिंत्रा'च्या ग्लॅम स्ट्रीमसाठी सानिया मिर्झाला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे की, तो भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली याला किंवा इतर कोणत्याही क्रिकेटपटूला आता शोमध्ये आमंत्रित करणार नाही. या निर्णयामागेचे कारणही त्याने उघड केले. जेव्हा सानियानं करणला विचारलं की, "'कॉफी विथ करण'मध्ये विराट कोहली का दिसला नाही?" यावर उत्तर देताना करण म्हणाला, "मी कधीही विराटला विचारलं नाही. हार्दिक आणि केएल राहुलसोबत जे घडलं त्यानंतर, मी कोणत्याही क्रिकेटपटूला बोलावणार नाही. असे अनेक खेळाडू ज्यांना बोलावलं तरी ते येणार नाहीत, हे मला माहितीये. त्यामुळे मी त्यांना बोलावलंच नाही".
२०१९ मध्ये, 'कॉफी विथ करण'च्या सहाव्या सीझनमध्ये भारतीय संघाचे खेळाडू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांनी हजेरी लावली होती. हा भाग खूप चर्चेत आला, पण यातील काही विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला. यावादावर करणने पुढे म्हटलं की, "मी हे सांगायलाच पाहिजे होतं की, मी स्वतः जबाबदार आहे कारण हा माझा शो आणि माझा प्लॅटफॉर्म होता. मी त्यांना पाहुणे म्हणून बोलावलं होतं".
"कॉफी विथ करण ६" कार्यक्रमात पांड्या काय बोलला होता?
करण जोहर : नाईट क्लबमध्ये तु मुलींना त्यांची नावं का नाही विचारत?
हार्दिक पांड्याः मला प्रत्येकीची नावं लक्षात राहत नाही. क्लबमध्ये मुली कशा चालतात हे मला पाहणे आणि निरिक्षण करायला आवडते. त्या कशा चालतात हे पाहण्यासाठी मी त्यांच्या मागेच उभा राहतो. मी जेव्हा पहिल्यांदा सेक्स केले. तेव्हा मी घरी येऊन म्हणालो की, मै करके आया आज ( आज मी करून आलो)'.'
कुटुंबीयही किती कूल आहेत हे पांड्या सांगू लागला. तो म्हणाला, ''एका पार्टीमध्ये आई-वडिलांनी मला विचारले, अच्छा तेरा वाला कौन सा है ( यातील तुझी गर्लफ्रेंड कोण?). त्यावेळी मी ही, ही, ही ( अनेक मुलींकडे बोट दाखवत) असे म्हणालो आणि त्यावर त्यांनी माझा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया दिली.
करण जोहर : तुम्ही दोघं एकाच मुलीच्या मागे लागलात, तर त्याचा निर्णय कसा घ्याल?
लोकेश राहुल : हा निर्णय त्या मुलीवर सोडू
हार्दिक पांड्या : असं काही नसत, सर्व काही टॅलेंटवर अवलंबून आहे. ज्याला मिळेल त्यानं घेऊन जावं.
हार्दिक पंड्याच्या या विधानांमुळे बराच गोंधळ उडाला. यामुळे हार्दिक आणि केएल राहुलवर कारवाई झाली होती. माफी मागितल्यानंतरही या दोघांना भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो भाग कॉफी विथ करणच्या सहाव्या सीझनमधूनही हटवण्यात आला होता.