खऱ्या आयुष्यात बॉलिवूडच्या कपूर आणि बच्चन कुटुंबात आहे 'हे' खास नातं, तुम्हाला माहितेय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:13 IST2025-11-27T13:10:03+5:302025-11-27T13:13:04+5:30
बच्चन आणि कपूर ही दोन मोठी घराणी एका मजबूत कौटुंबिक धाग्यात बांधली गेली आहेत.

खऱ्या आयुष्यात बॉलिवूडच्या कपूर आणि बच्चन कुटुंबात आहे 'हे' खास नातं, तुम्हाला माहितेय?
बॉलिवूडमध्ये प्रत्येकजण एकमेकांशी कनेक्ट आहे. कुणाचे मैत्रीचे संबंध आहेत. काहींचे नाते प्रेमाचे आहे, तर काहींमध्ये शत्रुत्व आहे. मात्र बॉलिवूडमध्ये काही कुटुंब अशी आहेत, ज्यांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यापैकीच एक आहेत बॉलिवूडमधील दोन सर्वात प्रतिष्ठित म्हणजेच कपूर आणि बच्चन घराणे. खऱ्या आयष्यातील कपूर आणि बच्चन कुटुंबातील नात्याबद्दल त्यांच्या चाहत्यांनाही फारशी माहिती नाही. या दोन्ही कुटुंबांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास अनेक पिढ्यांचा आहे आणि ही दोन्ही कुटुंबे एका महत्त्वपूर्ण कौटुंबिक नात्याने जोडली गेलेली आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिचं लग्न बिझनेसमन निखिल नंदा यांच्यासोबत झालं आहे. निखिल नंदा हे बॉलिवूडचे शो-मॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते राज कपूर यांची मुलगी ऋतु नंदा यांचे सुपुत्र आहेत. याचा अर्थ, श्वेता बच्चन-नंदा ही राज कपूर यांची नातसून आहे. या लग्नामुळे बच्चन आणि कपूर हे दोन्ही मोठे परिवार एका नात्यात गुंफले गेले आहेत. कपूर कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांचे नातू म्हणजे अगस्त आणि नव्या दिसून येतात. अलिकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'डाइनिंग विथ द कपूर' ते दिसले होते.
कपूर आणि बच्चन कुटुंबांमध्ये आणखी एक जवळचा संबंध जुळणार होता, जो अखेरीस तुटला. अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा २००२ साली साखरपुडा झाला होता. त्या काळात जया बच्चन यांनी एका कार्यक्रमात करिश्माची ओळख 'बच्चन कुटुंबाची सून' म्हणून करून दिली होती. मात्र, काही कारणांमुळे साखरपुड्यानंतर लगेचच हे नातं तुटलं. करिश्मा कपूरने नंतर संजय कपूर यांच्याशी लग्न केले होते. काहीकाळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. तर दुसरीकडे अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायशी लग्न केले.