कॅफे गोळीबारानंतर कपिल शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या, मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:02 IST2025-08-12T12:02:20+5:302025-08-12T12:02:47+5:30
मुंबई पोलिसांनी कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

कॅफे गोळीबारानंतर कपिल शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या, मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा
लोकप्रिय विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्मा चर्चेत आला आहे. कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात. या प्रकरणाला गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांत कपिलच्या कॅफेवर दोनदा गोळीबाराचीही घटना घडली आहे.
गेल्या १० जुलै रोजी कपिलच्या कॅनडास्थित कॅप्स कॅफेवर १० ते १२ राउंड गोळीबार करण्यात आला होता. हा व्हिडीओ गोळीबार करणाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीनं घेतली होती. लड्डी एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असून बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे. तर गेल्या गुरुवारी पुन्हा एकदा कॅफेवर गोळीबार झाला आणि या वेळी जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली. टोळीतील गँगस्टर गोल्डी ढिल्लननं सोशल मीडियावर याचा दावा केला.
अभिनेता सलमान खानला देखील बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या मिळाल्या आहेत. सलमान 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या पहिल्या भागात दिसला होता. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, बिश्नोई टोळीतील एका सदस्याने सलमानसोबत काम करणाऱ्यांना धमकी दिल्याचा ऑडिओ जारी केला. ऑडिओमध्ये हॅरी बॉक्सर संपूर्ण इंडस्ट्रीला धमकी देत म्हणाला, "कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये आधी आणि आता गोळीबार झाला. कारण त्याने सलमान खानला त्याच्या शोच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केलं होतं. पुढच्या वेळी, जो कोणी दिग्दर्शक, निर्माता, कलाकार असेल, आम्ही त्यांना इशारा देणार नाही. थेट छातीवर गोळी झाडली जाईल. मुंबईतील सर्व कलाकार आणि निर्मात्यांना इशारा आहे. आम्ही मुंबईचे वातावरण इतके बिघडवू की तुम्ही कल्पनाही केली नसेल".
सतत मिळणाऱ्या धमक्या आणि हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कपिल शर्माची सुरक्षा कडक केली आहे. सध्या कपिल त्यांच्या नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मुळे चर्चेत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.