जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 09:46 IST2025-12-01T09:45:23+5:302025-12-01T09:46:05+5:30
Jaya Bachchan : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी एका मुलाखतीत लग्न संस्थेबद्दल आपले मत परखडपणे मांडले. यावेळी त्यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन सतत चर्चेत येत असतात. बऱ्याचदा त्या पापाराझीवर चिडताना दिसतात आणि त्यांचे व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र यावेळी त्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आल्या आहेत. नुकतेच त्यांनी मुंबईत आयोजित 'वी द विमेन' कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी लग्न संस्थेबद्दल आपले मत परखडपणे मांडले. त्यांनी लग्न परंपरेला 'जुनी' म्हटले, तसेच एक धक्कादायक विधान केले की, त्यांना त्यांची नात नव्या नंदा हिने लग्न करू नये, असे वाटते.
जया बच्चन यांनी पत्रकार बरखा दत्त यांच्याशी संवाद साधताना सांगितले, ''मला नव्याने लग्न करावे असे वाटत नाही.'' लग्न एक जुनी परंपरा आहे का, असे विचारल्यावर त्यांनी सहमती दर्शवली आणि म्हणाल्या, ''हो, नक्कीच. मी आता आजी आहे. नव्या लवकरच २८ वर्षांची होईल. मी आता इतकी म्हातारी झाले आहे की, तरुण मुलींना मुलांचे संगोपन कसे करावे, याबद्दल सल्ला देऊ शकत नाही. गोष्टी खूप बदलल्या आहेत आणि आजकाल लहान मुले इतकी हुशार आहेत की, ती तुम्हाला हरवून टाकतील.''
'दिल्लीच्या लाडू'शी केली लग्नाची तुलना
जया बच्चन यांनी पुढे लग्नाची तुलना 'दिल्लीच्या लाडू'शी केली. त्यांनी सांगितले की, ''लग्नाची 'वैधता' कोणत्याही नात्याला परिभाषित करत नाही. त्या म्हणतात, 'तो दिल्लीचा लाडू... खाल्ला तर अडचण, नाही खाल्ला तरीही अडचण. दोन्ही अडचणीच आहेत. फक्त आयुष्याचा आनंद घ्या.''
पापाराझींवरही साधला निशाणा
याच कार्यक्रमात जया बच्चन यांनी पापाराझींवरही जोरदार टीका केली. त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले, ''हे जे बाहेर ड्रेन पाईपसारखे घट्ट, गलिच्छ कपडे घालून, हातात मोबाईल घेऊन असतात. त्यांना असे वाटते की, त्यांच्याकडे फक्त मोबाईल असल्यामुळे ते तुमचे फोटो घेऊ शकतात आणि जे पाहिजे ते बोलू शकतात आणि ते कशा प्रकारच्या टीका-टिप्पण्या कॉमेंट्स करतात.''
जया बच्चन यांचे आगामी चित्रपट
चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, जया बच्चन लवकरच 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग' या चित्रपटात दिसणार आहेत. यात त्यांच्यासोबत वामिका गब्बी आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील आहेत.