हिंदूंवरील वक्तव्यावरून पाक लष्करप्रमुखांवर जावेद अख्तरांनी ओढले ताशेरे, म्हणाले "असंवेदनशील माणूस..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:11 IST2025-05-15T12:59:28+5:302025-05-15T13:11:31+5:30
हिंदूबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर संतापले जावेद अख्तर!

हिंदूंवरील वक्तव्यावरून पाक लष्करप्रमुखांवर जावेद अख्तरांनी ओढले ताशेरे, म्हणाले "असंवेदनशील माणूस..."
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी शेजारील देश पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुनीर यांनी एका भाषणात हिंदूंविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत अख्तर यांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. एवढेच नाही तर जावेद अख्तर यांनी कारगिल युद्धानंतर पाकिस्तानने आपल्याच सैनिकांचे मृतदेह घेण्यास नकार दिल्याच्या भ्याड कृत्याचीही आठवण करून दिली.
जावेद अख्तर यांनी नुकतंच कपिल सिब्बल यांच्या मुलाखतीत असीम मुनीर यांना खडेबोल सुनावले. जावेद अख्तर म्हणाले, "मी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे भाषण यूट्यूबवर पाहिले. तो असंवेदनशील माणूस वाटत होता. जर तुम्हाला वाटत असेल की, आम्ही वाईट आहोत, तर भारतीयांना शिवीगाळ करा; पण तुम्ही हिंदूंना शिवीगाळ का करीत आहात? पाकिस्तानमध्येदेखील हिंदू लोक राहतात, हे त्यांना समजत नाही का? तुम्ही स्वतःच्या देशातील नागरिकांचा आदर करू शकत नाही का?"जनरल मुनीर यांचे वक्तव्य पूर्णतः असंवेदनशील आणि चिथावणीखोर होतं".
अख्तर यांनी स्पष्टपणे सांगितले की, "भारताचा विरोध हा पाकिस्तानच्या लष्कर, अतिरेकी आणि सरकारच्या धोरणांना आहे, सामान्य नागरिकांशी नाही. जो देश स्वतःच्याच नागरिकांचा आदर करत नाही, तो दुसऱ्यांच्या धर्मावर बोलण्यास पात्र नाही", या शब्दात त्यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखावर टीका केली.
कारगिल युद्धाच्या काळातील एक घटना आठवताना जावेद अख्तर म्हणाले की, " जेव्हा आपला एखादा सैनिक मृत्युमुखी पडतो, तेव्हा आपण त्याला सलाम करतो, पण जेव्हा कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिक मारले गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या मृतदेहांवरही दावा केला नाही. भारतीयांनीच त्याचे योग्य अंत्यसंस्कार केले. आपल्या एका उच्चपदस्थ सैनिकाने त्यांच्या शहीद सैनिकांचे फोटो काढले, एक अल्बम बनवला आणि तो पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर सादर केला. त्यांनी तो घेण्यास नकार दिला. नंतर जेव्हा मिटिंग संपली, त्यांनी तो अल्बम अनधिकृतपणे स्वीकारला. यावरूनच त्यांच्या लष्कराच्या संवेदनशीलतेचा आणि मानवीय भानाचा अभाव दिसतो".
अनेक अरब देशांनी पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा मिळण्यास बंदी घातली आहे. याचे उदाहरण देताना जावेद अख्तर म्हणाले की, "हे अगदी दिल्लीच्या रस्त्यांवरील एका मुलासारखं आहे, जो म्हणते की तो शाहरुख खानचा भाऊ आहे. पण, मित्रा, शाहरुख खानला तू कोण आहेस हे माहित नाही. अशी पाकिस्तानची अवस्था आहे".
हिंदूबद्दल नेमकं काय म्हणाले होते जनरल असीम मुनीर?
पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी एका भाषणात म्हटलं होतं, "आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत. आपल्या परंपरा वेगळ्या आहेत. आपले विचार वेगळे आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत".