बॉलिवूड सरकारविरोधात गप्प का? जावेद अख्तर यांनी सांगितली आतली गोष्ट! म्हणाले "एक उद्योगपती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:24 IST2025-05-12T13:22:18+5:302025-05-12T13:24:47+5:30
सरकारला घाबरतात बॉलिवूड स्टार्स? जावेद अख्तर यांनी फोडला बॉम्ब!

बॉलिवूड सरकारविरोधात गप्प का? जावेद अख्तर यांनी सांगितली आतली गोष्ट! म्हणाले "एक उद्योगपती..."
Javed Akhtar Bollywood Ed Fear: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर हे आपल्या स्पष्ट, निर्भीड मतांसाठी प्रसिद्ध आहेत. मग मुद्दा राजकीय असो, सामाजिक असो, किंवा धर्म-संस्कृतीशी जोडलेला असो जावेद अख्तर यांनी नेहमीच स्पष्ट भूमिका घेतली आहे. आता पुन्हा एकदा ते स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आले आहेत. राजकीय मुद्द्यावर बॉलिवूडमधील सेलिब्रिटी गप्प का असतात, याबद्दल त्यांनी खुलासा केलाय. ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जावेद अख्तर यांनी कपिल सिब्बल यांच्या मुलाखतीत एक महत्त्वाचं विधान केलं. जगभरात, विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये, कलाकार सरळसरळ राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका घेतात. अमेरिकेतील ऑस्कर पुरस्कार समारंभात मेरिल स्ट्रीपसारखे कलाकार सरकारवर थेट टीका करतात. पण इथले कलाकार गप्प का आहेत? आधी तर असं नव्हतं, असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी विचारला. यावर जावेद अख्तर यांनी अतिशय ठाम आणि थेट उत्तर दिलं.
जावेद म्हणाले, " बॉलिवूडमधील अनेक कलाकार मोठ्या नावाने ओळखले जात असले, तरी त्यांचं आर्थिक स्थैर्य तेवढंही चांगलं नाही. सर्व बॉलिवूडकरांना एक उद्योगपती आपल्या खिशात ठेवू शकतो. जर आपण पाहिलं तर ज्यांच्याकडे पैसा आहे, जे मोठे आहेत, ते तरी कुठे बोलतात? कुणीच बोलत नाही", असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.
पुढे ते म्हणाले, "मेरिल स्ट्रीपनं ऑस्करमध्ये उभं राहून सरकारवर टीका केली, पण तिच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला नाही. इथे मात्र असं होऊ शकतं, म्हणूनच कलाकार शांत राहतात" असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. जावेद अख्तर यांचं हे विधान सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरत आहे. काहींनी त्यांचं समर्थन केलं, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.