दहीहंडीला "भारत माता की जय" बोलल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "नसते बोलले तर.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 08:54 IST2025-08-18T08:51:59+5:302025-08-18T08:54:51+5:30
दहीहंडीच्या दिवशी "भारत माता की जय" म्हटल्याने जान्हवीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्या ट्रोलर्सला आता जान्हवीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.

दहीहंडीला "भारत माता की जय" बोलल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "नसते बोलले तर.."
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी 'परमसुंदरी' सिनेमामुळे चर्चेत आहे. जान्हवीने नुकतीच मुंबईतील घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये जान्हवीने दडीहंडी फोडताना "भारत माता की जय" घोषणा दिल्या. दहीहंडीच्या दिवशी "भारत माता की जय" म्हटल्याने जान्हवीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्या ट्रोलर्सला आता जान्हवीने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.
दहीहंडीच्या इव्हेंडमधला व्हिडीओ जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. या व्हिडीओत भाजपा आमदार राम कदम "बोलो भारत माता की जय" अशा घोषणा देत आहेत. त्यानंतर ते जान्हवीलाही घोषणा देत दहीहंडी फोडण्यासाठी सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. दहीहंडी कार्यक्रमातील जान्हवीचा हा व्हिडीओ व्हायरल करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी एकाच दिवशी साजरा केल्याचं म्हणत जान्हवीला ट्रोल करण्यात आलं होतं. त्या ट्रोलर्सला जान्हवीने चांगलंच सुनावलं आहे.
हा व्हिडीओ शेअर करत ती म्हणते, "त्यांनी सांगितल्यानंतर जर मी म्हणाले नसते तरी प्रॉब्लेम झाला असता. आणि बोलले तरी व्हिडीओ एडिट करून मीम मटेरियल... तसं तर फक्त जन्माष्टमीला नव्हे तर मी रोज भारत माता की जय म्हणणार".
जान्हवीने या पोस्टमधून ट्रोलर्सला चांगलीच चपराक दिली आहे. जान्हवी 'परमसुंदरी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जान्हवीसोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. येत्या २९ ऑगस्टला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.