Video: "तुला एक कानाखाली मारेन..."; फराह खानसमोरच तिचा कूक दिलीपला जॅकी श्रॉफ असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:11 IST2025-10-21T17:57:14+5:302025-10-21T18:11:33+5:30
फराह खानच्या व्लॉगमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात जॅकी श्रॉफ दिलीपवर ओरडताना दिसतात. काय घडलं नेमकं?

Video: "तुला एक कानाखाली मारेन..."; फराह खानसमोरच तिचा कूक दिलीपला जॅकी श्रॉफ असं का म्हणाले?
अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि चित्रपट निर्मात्या फराह खान (Farah Khan) यांची खास मैत्री सर्वांना माहितच आहे. अलीकडेच फराह खान तिच्या व्लॉगनिमित्त (Vlog) तिचा कुक दिलीपला घेऊन जॅकी श्रॉफ यांच्या फार्महाऊसवर गेली होती. या भेटीदरम्यान जॅकी आणि दिलीप यांच्यात झालेला संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
फराह खान आणि दिलीप जेव्हा जॅकी श्रॉफ यांच्या आलिशान फार्महाऊसवर पोहोचले, तेव्हा जॅकी श्रॉफ निवांत आराम करत होते. दिलीप जग्गू दादांचे पाय धरून आशीर्वाद घेणार, त्याआधीच जॅकी श्रॉफ यांनी दिलीपचे पाय धरले. या अनपेक्षित कृतीने दिलीप आणि फराह खान दोघेही थक्क झाले. दिलीप त्यांच्या पाया पडणार तोच जॅकी श्रॉफ यांनी दिलीपला थांबवत त्याला फराह खानचे पाय धरण्याचा सल्ला दिला आणि गंमतीने म्हणाले, "माझे पाय नको धरूस, फराहचे पाय धर. हिनेच तुला स्टार बनवलं आहे, तुला चमकवलं आहे."
फराहने तिच्या यशाचं क्रेडीट जॅकी श्रॉफ यांना दिलं. हे ऐकताच जॅकी श्रॉफ म्हणाले की, ''मी नाही तर फराहच्या टॅलेंटने तिला यशस्वी केलं आहे.'' या भेटीदरम्यान जॅकी श्रॉफ यांनी लुंगी परिधान केली होती. दिलीपलाही जॅकी श्रॉफ यांच्यासारखी लुंगी नेसायची इच्छा झाली. जॅकी यांनी दिलीपला एक लुंगी आणून दिली.
दिलीपला लुंगी नेसण्यास जग्गू दादा मदत करू लागले. यावेळी दिलीपने फराहला विचारलं, "मी पॅन्ट काढून लुंगी घालू का?" दिलीप यांचा हा प्रश्न ऐकून जॅकी श्रॉफ एकदम चिडले आणि गंमतीने म्हणाले, "फराहसमोरच तुझ्या कानाखाली एक आवाज काढेन, असं बोलू नकोस!" जॅकी श्रॉफ यांनी मस्करीमध्ये दिलीपला ओरडून शांत केलं. हा संपूर्ण संवाद फराह खानच्या व्लॉगमध्ये शूट झाला आहे.