लंडनमध्ये शिकतो इरफान खानचा मुलगा बाबिल, लॉकडाऊनआधीच परतला होता घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:48 IST2020-04-29T16:47:17+5:302020-04-29T16:48:35+5:30
रूग्णालयात इरफानने अखेरचा श्वास घेतला. सुदैवाने यावेळी त्याचे कुटुंब त्याच्यासोबत होते.

लंडनमध्ये शिकतो इरफान खानचा मुलगा बाबिल, लॉकडाऊनआधीच परतला होता घरी
बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खानच्या निधनाच्या बातमीने अद्यापही चाहते धक्क्यात आहेत. मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात इरफानने अखेरचा श्वास घेतला. सुदैवाने यावेळी त्याचे कुटुंब त्याच्यासोबत होते. पत्नी सुतापा आणि दोन्ही मुले बाबिल आणि अयान इरफानसोबत रूग्णालयातच होते.
इरफानचा मोठा मुलगा बाबिल हा लंडन युनिव्हर्सिटीत शिकतो. लॉकडाऊनच्या काही दिवस आधी तो लंडनवरून भारतात परतला होता. तो घरी परतल्यावर त्याची आई सुतापाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला होता.
तिने लिहिले होते, ‘सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी आभार. बाबिल सुरक्षित घरी पोहोचला. त्याची मदत करणा-या सगळ्यांचे आभार. त्याची फ्लाइट एक तास लेट होती. मी एअरपोर्टवर त्याची प्रतीक्षा करत होते. साहजिकच चिंतेत होते. सर्वांनी मास्क घातले होते. आपली जवळची व्यक्ति दिसताच लोक तिला प्रेमाने मिठी मारताना पाहून माझे मन भरून येत होते. मी घरून दोन कार घेऊन गेले होते. बाबिलला मी माझ्या कारमध्ये न बसवता दुस-या कारमध्ये बसवले. त्याला मिठीही मारली नाही. एअरपोर्टवर त्याचे थर्मल चेकअप झाले आणि त्यांनी त्याला जाऊ दिले. मला थोडे आश्चर्यही वाटले. कारण कोरोनाची भारतातील स्थिती बघता त्यांनी बाबिलला होम क्वारंटाइनबद्दल काहीही निर्देश दिले नव्हते. केवळ एक फॉर्म तेवढा भरून घेतला. पण मी माझ्या मुलाला 14 दिवस एका खाली फ्लॅटमध्ये ठेवले. लोकांनी मला वेड्यात काढले. पण सावधानी हटी दुर्घटना घटी, याप्रमाणे मला कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. मग मला लोकांनी वेड्यात काढले तरी चालेल...’
1995 मध्ये इरफान व सुतापा यांचे लव्ह मॅरेज झाले होते. इरफान व सुतापाला आणखी एक मुलगा आहे. त्याचे नाव अयान. अयान सध्या शिकतोय. ‘लाइफ ऑफ पाई’ या सिनेमात अयान आपल्या वडिलांसोबत म्हणजेच इरफानसोबत झळकला होता.