अखेरच्या क्षणी धर्मेंद्र यांची प्रकृती नेमकी कशी होती? हेमा मालिनी बोलताना झाल्या भावुक, म्हणाल्या-"त्यांना त्या अवस्थेत पाहणं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:44 IST2026-01-05T16:41:21+5:302026-01-05T16:44:34+5:30
हेमा मालिनी पतीच्या आठवणीत झाल्या भावुक, म्हणाल्या-"तो काळ आमच्यासाठी…"

अखेरच्या क्षणी धर्मेंद्र यांची प्रकृती नेमकी कशी होती? हेमा मालिनी बोलताना झाल्या भावुक, म्हणाल्या-"त्यांना त्या अवस्थेत पाहणं..."
Hema Malini Talk About Dharmendra: बॉलिवूडमध्ये स्टारडम हे फारसं टिकत नाही. पण धर्मेंद्र यांना मिळालेलं स्टारडम आजतागायत कोणाला मिळालं नाही.बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून चाहत्यांमध्ये ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र या जगात नाहीत. २४ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांचं निधन होऊन जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. शिवाय या धक्क्यातून त्यांचे कुटुंबीय अजूनही सावरले नाहीत.त्यांच्या निधनानंतर, पत्नी हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.या दरम्यान अभिनेत्रीने धर्मेंद्र यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगितलं.
अलिकडेच हेमा मालिनी यांनी शेवटच्या क्षणी धर्मेंद्र यांची प्रकृती कशी होती याबद्दल खुलासा केला आहे.ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या की, शेवटच्या दिवसांमध्ये धर्मेंद्र यांना त्या अवस्थेत पाहणं कठीण होतं आणि अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये.धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनींनी म्हटलं," तो खूप मोठा धक्का होता.तो काळ आमच्यासाठी खूप कठीण होता, कारण ते आजारी असताना आम्ही महिनाभर संघर्ष करत होतो.हॉस्पिटलमध्ये जे काही घडत होतं. त्या प्रत्येक गोष्टीचा सामना करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत होतो. मी, ईशा, अहाना, सनी आणि बॉबी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत तिथे होतो. यापूर्वीही असं अनेकदा घडलं होते, जेव्हा ते रुग्णालयात गेले होते आणि बरे होऊन घरी परत आले होते. आम्हाला वाटलं होत की, यावेळीही ते परत येतील.
त्यानंतर हेमा मालिनी म्हणाल्या,"ते आमच्याशी प्रेमाने बोलत होते. त्यांनी १६ ऑक्टोबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छाही दिल्या होत्या. ८ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस होता. ते ९० वर्षांचे होणार होते. त्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा असं ठरवलं होतं. आमची तयारी सुरू होती, आणि अचानक त्यांचं निधन झालं. त्यांना त्या अवस्थेत पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं."