वयाच्या साठीतही गोविंदाचा जलवा कायम! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:18 IST2025-08-19T16:17:31+5:302025-08-19T16:18:03+5:30
गोविंदाचा डान्स पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही थक्क! अभिनेत्याचा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, "वाह क्या बात है!"

वयाच्या साठीतही गोविंदाचा जलवा कायम! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
दहीहंडीचा उत्सव हा महाराष्ट्रामध्ये उत्साहात साजरा होतो. मुंबईत तर या उत्सवाला एक वेगळाच जल्लोष असतो. यंदाच्या दहीहंडी उत्सवात बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा सहभागी झाला आणि त्याच्या जबरदस्त डान्सने सर्वांची मनं जिंकली. विशेष म्हणजे, त्याचा हा डान्स पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता शरद केळकरही थक्क झाले. हा क्षण एका व्हिडीओमध्ये कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आपल्या डान्स स्टेप्स आणि खास शैलीसाठी ओळखला जाणारा गोविंदा हा वयाची साठी ओलांडल्यानंतरही तितक्याच उत्साहात दिसला. दहीहंडीच्या मंचावर चाहत्यांच्या आग्रहास्तव त्याने आपल्याच काही लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरला. यावेळी त्याने केलेल्या या दमदार परफॉर्मन्सला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि शिट्ट्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. यावेळी मंचावर गोविंदाच्या मागे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता शरद केळकर उभे होते. गोविंदा जेव्हा डान्स करत होता, तेव्हा हे दोघेही मंत्रमुग्ध होऊन त्याचा डान्स पाहत राहिले. या व्हिडीओमध्ये गोविंदाची ऊर्जा पाहून चाहते अजूनही 'हिरो नंबर वन' असल्याच्या कमेंट्स करत आहेत.
गोविंदाची ऊर्जा आणि त्याचा डान्स आजही तरुण कलाकारांना लाजवेल असा आहे. गोविंदाने आतापर्यंत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजही त्याचे चित्रपट टीव्हीवर आणि ओटीटीवर आवडीने पाहिले जातात. गेल्या बऱ्याच काळापासून गोविंदाचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्याचे चाहते त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.