रुपेरी पडद्यावरील 'संजू' अर्थात रणबीरसह फॅन्सची धम्माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:48 IST2018-07-02T14:45:46+5:302018-07-02T14:48:06+5:30
सिनेमाला मिळणारे यश आणि रसिकांचा प्रतिसाद पाहून भारावल्याचे रणबीरने म्हटले आहे. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राजकुमार हिरानी यांनी व्यक्त केली.

रुपेरी पडद्यावरील 'संजू' अर्थात रणबीरसह फॅन्सची धम्माल
राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि अभिनेता रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'संजू' सिनेमा नुकताच रुपेरी पडद्यावर झळकला. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाला तिकीटखिडकीवर रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. रणबीरने मोठ्या खुबीने संजूला रूपेरी पडद्यावर साकारला आहे. रणबीरच्या अभिनयाचे आणि सिनेमाच्या कथेचे तसंच राजकुमार हिरानी यांचं सगळ्यांकडूनच कौतुक होतंय. त्यामुळेच की या सिनेमाने तिकीटखिडकीवर १०० कोटी कमाईचा पल्लाही पार केला आहे. 'संजू' सिनेमाला मिळणारा प्रतिसाद आणि संजू साकारणारऱ्या रणबीरची क्रेझ पाहता मुंबईत गोरेगाव पीव्हीआर इथे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेता रणबीर कपूर,दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि लोकमत समूहाचे सह व्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा उपस्थित होते. यावेळी रणबीरच्या फॅन्सना त्याच्यासह सेल्फी काढण्याचीही संधी उपलब्ध झाली.
इतकंच नाही तर रणबीरने यावेळी उपस्थितांशी संवादही साधला. संजू सिनेमाच्या सुरुवातीपासून ते सिनेमाला मिळणारं यश यावर रणबीरने मनमोकळ्या गप्पा मारल्या. सिनेमाला मिळणारे यश आणि रसिकांचा प्रतिसाद पाहून भारावल्याचे रणबीरने म्हटले आहे. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राजकुमार हिरानी यांनी व्यक्त केली. संजू म्हणजेच संजय दत्त साकारणं हे खरंच खूप आव्हानात्मक होतं असं रणबीरने सांगितले. मात्र हिरानी यांची स्क्रीप्ट आणि प्रयत्न इतका प्रामाणिक होता की सगळे आपसुक होत गेलं असंही रणबीरने नमूद केलं.यावेळी रणबीरची एक झलक पाहायला मिळावी, त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करता यावं किंवा त्याच्यासह सेल्फीची संधी मिळावी यासाठी रसिकांनी गर्दी केली होती.
यावेळी रणबीरनेही त्याच्या फॅन्सना निराश केले नाही आणि विविध पोज देत त्यांच्यासह फोटो अन् सेल्फी काढले. शिवाय रणबीरने यावेळी संजू स्टाईल डॉयलॉग बोलून दाखवत उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी लोकमत समूहाचे सह व्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी रणबीरला पुणेरी पगडी घालून त्यांचा गौरव केला. 'संजू' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लोकमतने केलेल्या सहकार्याबद्दल हिरानी यांनी विशेष आभारही व्यक्त केले.