"आमिरनं मला एक वर्ष घरात कैद करून ठेवलं, औषधं दिली" अभिनेता फैसल खान काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 09:36 IST2025-08-10T09:32:04+5:302025-08-10T09:36:47+5:30
आमिर खानचा भाऊ आणि अभिनेता फैसल खानने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

"आमिरनं मला एक वर्ष घरात कैद करून ठेवलं, औषधं दिली" अभिनेता फैसल खान काय म्हणाला?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) नेहमीच आपल्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता मात्र त्याचं कुटुंब चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. आमिरचा भाऊ आणि अभिनेता फैसल खानने (Faissal Khan) धक्कादायक खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी आमिरने त्याला मुंबईतील स्वतःच्या घरात तब्बल एक वर्षापेक्षा जास्त काळ कोंडून ठेवले होते, असं त्यानं सांगितलंय. एका खाजगी मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत त्याने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलंय.
फैजलनं नुकतंच 'पिंकव्हिला'ला मुलाखत दिली. यावेळ तो म्हणाला, "त्या काळात मला वाटायचं की मी अडकलो आहे. सगळे म्हणत होते की मला स्किझोफ्रेनिया आहे आणि मी वेडा आहे. कुटुंब म्हणायचं की मी समाजासाठी धोकादायक आहे. संपुर्ण कुटुंब माझ्या विरोधात होतं".
तो म्हणाला, "आमिरने मला एक वर्ष घरात कैद केले होते. त्याने माझा मोबाईल फोन काढून घेतला, बाहेर पडण्याची मुभा नव्हती. खोलीबाहेर अंगरक्षक तैनात होते आणि मला औषधं दिली जायची. जवळपास एका वर्षानंतर, माझ्या सततच्या आग्रहानंतर आमिरने मला दुसऱ्या घरात राहण्याची परवानगी दिली". पुढे फैजलनं सांगितलं की, जेजे हॉस्पिटलमध्ये त्याची २० दिवस मानसिक चाचणी घेण्यात आली होती. ज्यात तो पूर्णपणे निरोगी असल्याचे निष्पन्न झाले.
फैसलने १९८८ मध्ये कयामत से कयामत तक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर मधोश, चिनार दास्तान-ए-इश्क यांसारख्या चित्रपटांत तो दिसला. २००० मध्ये प्रदर्शित धर्मेश दर्शन दिग्दर्शित 'मेला'मध्ये तो आमिर खान आणि ट्विंकल खन्नासोबत झळकला होता.