इराण-इस्रायल-अमेरिकेच्या तणावात अबू धाबीमध्ये अडकली ईशा गुप्ता, म्हणाली "वेळ भीषण आहे, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 16:07 IST2026-03-01T16:01:07+5:302026-03-01T16:07:58+5:30
अभिनेत्रीने स्टेटस ठेवत परिस्थितीची माहिती दिली आहे. तसंच देवाकडे प्रार्थनाही केली आहे.

इराण-इस्रायल-अमेरिकेच्या तणावात अबू धाबीमध्ये अडकली ईशा गुप्ता, म्हणाली "वेळ भीषण आहे, पण..."
अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. यामुळे अनेक ठिकाणची विमानसेवा बंद करण्यात आली असून, शेकडो भारतीय अडकल्याची माहिती मिळाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता अबू धाबीमध्ये अडकली आहे.
ईशाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले, "माझ्याबद्दल विचारणाऱ्या सर्वांना सांगू इच्छिते की आम्ही सुरक्षित आहोत. काळ सध्या अत्यंत भयावह आणि कठीण आहे, पण आमचा देवावर विश्वास आहे. संरक्षण मंत्रालय सर्व अडथळे दूर करून सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम प्रयत्न करत असल्याचे आम्हाला माहीत आहे. लवकरच मायदेशी परतण्याची आशा आहे". ईशाने अबू धाबीच्या आकाशाचा एक फोटो शेअर करत प्रार्थना करणारा इमोजीही जोडला आहे.

फक्त ईशाचं नाही तर बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानदेखील दुबईत अडकली आहे. सोनल चौहानने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत भारत सरकारकडे मदतीची विनंती केली. तिने लिहिले, "माननीय नरेंद्र मोदीजी, सध्या दुबईतील तणावपूर्ण परिस्थितीत मी अडकले आहे. सर्व फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नाही. सुरक्षित घरी परतण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शन आणि मदतीची अपेक्षा आहे", असं तिने लिहिलंय. तसेच दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिनेदेखील विमानतळावरील गोंधळाची झलक शेअर करत पुढील सूचनेपर्यंत सर्व उड्डाणे स्थगित असल्याचे सांगितले.