इमरान हाश्मी - यामी गौतमच्या 'हक' सिनेमाचा टीझर, भारतात घडलेल्या 'या' सत्य घटनेवर आधारीत कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:20 IST2025-09-23T13:19:20+5:302025-09-23T13:20:10+5:30
भारतातील वादग्रस्त प्रकरणावर आधारीत 'हक' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. इमरान-यामीच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळतेय

इमरान हाश्मी - यामी गौतमच्या 'हक' सिनेमाचा टीझर, भारतात घडलेल्या 'या' सत्य घटनेवर आधारीत कहाणी
जंगली पिक्चर्सने 'इन्सोम्निया फिल्म्स' आणि 'बावेजा स्टुडिओज' यांच्यासोबत मिळून आपली नवी फिल्म 'हक'चा टीझर रिलीज केलाय. 'मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम' या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने प्रेरित या सिनेमाची कथा असणार आहे. या चित्रपटात यामी गौतम धर आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिका साकारणार असून सिनेमाचं दिग्दर्शन सुपर्ण एस. वर्मा यांनी केलं आहे. जाणून घ्या सिनेमाच्या टीझरबद्दल
'हक' हा चित्रपट 'पर्सनल लॉ आणि सेक्युलर लॉ' यांच्यातील वादाला समोर आणतो. हा चित्रपट जिग्ना वोरा यांनी लिहिलेल्या "बानो: भारत की बेटी" या पुस्तकावर आधारित काल्पनिक व नाट्यमय कथा असणार आहे. शाह बानो बेगम यांनी ८० च्या दशकात पुरुषप्रधान समाजात आपला स्वाभिमान आणि हक्क यासाठी लढा दिला होता. चार दशकांपूर्वी सुरू झालेला हा वाद आजही समाजात तितकाच सुसंगत आहे. 'हक'च्या टीझरमधून हाच वाद प्रखरपणे आणि प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
'हक' चित्रपटाच्या माध्यमातून यामी गौतम धर आणि इमरान हाश्मी प्रथमच या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. इमरान हाश्मी एक बुद्धिमान व नामांकित वकीलाची भूमिका करत असून यामी समाजाला विचार करायला भाग पाडणाऱ्या लढाईचं नेतृत्व करतात. ‘हक’ ही कथा एका प्रेमकथेसारखी सुरू होते. पण नवरा-बायकोतील वादापासून ही कथा पुढे जाते आणि एक मोठ्या विषयाला हात घालते.
चित्रपटात कोर्टरूम ड्रामा रंगताना दिसणार आहे. 'हक' हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. आजच्या उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक सुपर्ण एस. वर्मा (सिर्फ एक बंदा काफी है, द फॅमिली मॅन, राणा नायडू) यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून, रेशु नाथ यांनी कथा लिहिली आहे. या चित्रपटात यामी आणि इमरानसोबतच शीबा चड्ढा, दानिश हुसेन आणि असीम हट्टंगडी यांसारखे अनुभवी कलाकार देखील आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने यामी आणि इमरान पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत असून दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ज्वलंत विषयावरील हा चित्रपट नक्कीच परिणाम साधेल, अशी प्रेक्षकांना आशा आहे.