एकता आणि तिचा भाऊ तुषार कपूरने लग्न का केलं नाही? अखेर टेलिव्हिजन 'क्वीन'ने सांगितले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:54 IST2026-02-09T13:53:08+5:302026-02-09T13:54:35+5:30
एकता आणि तुषार कपूरच्या 'सिंगल' असण्यामागचं खरं कारण काय? दोघांनाही आहेत मुलं

एकता आणि तिचा भाऊ तुषार कपूरने लग्न का केलं नाही? अखेर टेलिव्हिजन 'क्वीन'ने सांगितले कारण
भारतीय टेलिव्हिजनची 'क्वीन' म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर आणि अभिनेता तुषार कपूर हे दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुले आहेत. एकता आणि तुषार ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहीण-भावाची जोडी आहे. दोघेही अविवाहित असून, सरोगसीद्वारे 'सिंगल पेरेंट्स' बनले आहेत. एकताच्या मुलाचं रवी तर तुषारच्या मुलाचं लक्ष्य असं नाव आहे. एकता आणि तुषारकडे आज नाव, पैसा आणि प्रसिद्धी सगळं काही आहे. पण, त्यांनी लग्न का केलं नाही, हा प्रश्न अनेकदा त्यांना विचारला जातो. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एकताने यावर भाष्य केलंय.
एकता कपूर अलीकडेच उषा काकडे यांच्या 'Known Unknown' पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. या पॉडकास्टमध्ये एकताने लग्न न करण्यामागचं वैयक्तिक कारण स्पष्ट केलं. एकता कपूर म्हणाली की, "मी आणि तुषार, आम्ही दोघांनीही आजपर्यंत लग्न केलं नाही. कारण आम्हाला कामात व्यस्त राहणं अधिक महत्त्वाचं वाटलं".
एकताने आपल्या बालपणीचा एक किस्साही सांगितला. ती म्हणाली की, "मी १८ वर्षांची असताना वडील म्हणाले होते,आयुष्यात काहीतरी कर, नाहीतर तुझं लग्न लावून देईन". हे वाक्यच एकतासाठी प्रेरणादायी ठरलं. लग्नापासून दूर राहण्यासाठी तिने कामालाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून तिचं संपूर्ण लक्ष करिअरवर केंद्रित झालं.
एकता म्हणाली, "आम्ही दोघांनीही आमचं स्वतःचं कुटुंब तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मग लग्नाचा हा सर्कस कशासाठी? तुषारला 'लक्ष्य' नावाचा मुलगा आहे आणि मला 'रवी' नावाचा मुलगा आहे. हेच आमचं पूर्ण कुटुंब आहे. मग आता लग्नासाठी वेळ कुठे आहे?" आपल्या आसपासच्या मित्रांचे तुटलेले संसार आणि घटस्फोट पाहून तिने हा निर्णय घेतल्याचेही सूचकपणे सांगितले. एकता आणि तुषार दोघेही 'सिंगल पेरेंट्स' आहेत. तुषारने सरोगसीद्वारे लक्ष्यला जन्म दिला, तर २०१९ मध्ये एकतानेही सरोगसीच्या मदतीने रवीचे स्वागत केले. "एखाद्या चुकीच्या लग्नात अडकून राहण्यापेक्षा एकटे पालकत्व स्वीकारून आनंदी राहणे कधीही चांगले" असे स्पष्ट मत तिने मांडले.