पावना लेक फार्महाउसवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन, सुशांतच्या बँक खात्यातून झाला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 06:30 IST2020-09-19T01:59:18+5:302020-09-19T06:30:24+5:30
सुशांतच्या बँक तपशिलातून पावना लेक फार्महाउस पार्टीची माहिती समोर आली आहे. २९ मार्च रोजी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

पावना लेक फार्महाउसवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन, सुशांतच्या बँक खात्यातून झाला खुलासा
मुंबई : सुशांतच्या मृत्युप्रकरणानंतर नवनवीन खुलासे समोर येत असताना, ‘छिछोरे’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता सुशांतसिंह राजपूतने त्याच्या पावना फार्महाउसवर ड्रग्ज पार्टीचे आयोजन केले होते, अशी माहिती आहे. याबाबत एनसीबीचे पथक अधिक तपास करत आहे. यासाठी त्याने ४० हजार रुपये खर्च केला होता.
सुशांतच्या बँक तपशिलातून पावना लेक फार्महाउस पार्टीची माहिती समोर आली आहे. २९ मार्च रोजी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मोजकीच मंडळी या पार्टीत सहभागी झाली होती. त्यासाठी सुशांतने ४० हजार रुपये खर्च केल्याचे त्याच्या बँक स्टेटमेंटमधून उघडकीस आले. या पार्टीत ड्रग्जचे सेवन करण्यात आल्याची माहिती एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज पेडलरच्या चौकशीतून समोर आली. याबाबत अधिक तपास सुरू आहे. सुशांतच्या मित्रांव्यतिरिक्त अनेक बड्या सेलिब्रिटींनीही येथे पार्टी केल्याचे समजते.
सीबीआयची दिल्लीत बैठक
सुशांतच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या पथकापैकी एक पथक शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत सीबीआयच्या मुख्यालयात त्यांची बैठक पार पडली. सुशांतच्या घरी तपास केलेल्या पथकाचा यात समावेश होता. यावेळी सुशांतच्या मृत्युप्रकरणी आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.