"मला डॉ. लागूंनी १० हजार रुपयांची मदत केली, म्हणून.."; आमिर खानने सांगितला कधीही न सांगितलेला किस्सा
By देवेंद्र जाधव | Updated: July 1, 2025 12:54 IST2025-07-01T12:53:40+5:302025-07-01T12:54:10+5:30
आमिर खानला डॉ. श्रीराम लागूंनी १० हजार रुपयांची मदत का केली? याचा खास किस्सा आमिरने उलगडून दाखवला. हा किस्सा वाचून डॉ. लागूंबद्दल तुमचा आदर आणखी वाढेल

"मला डॉ. लागूंनी १० हजार रुपयांची मदत केली, म्हणून.."; आमिर खानने सांगितला कधीही न सांगितलेला किस्सा
आमिर खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. आमिरला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. आमिर आज जरी यशाच्या शिखरावर असला तरीही सुरुवातीला त्यानेही संघर्षाचा काळ अनुभवला आहे. आमिरला जेव्हा पहिला सिनेमा बनवायचा होता तेव्हा मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते डॉ. श्रीराम लागूंनी आमिरला १० हजार रुपयांची मदत केली होती. काय होता तो किस्सा, जाणून घ्या.
डॉ. लागूंनी आमिरला दिले होते १० हजार
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आमिरने हा खास किस्सा सर्वांना सांगितला. आमिरने सांगितलं की, "१० वी नंतर मी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला. माझ्या वर्गात आदित्य भट्टाचार्य होता. बासु दा (दिग्दर्शक बासु भट्टाचार्य) यांचा तो मुलगा. तो एक शॉर्ट फिल्म बनवत होता. त्याने मला विचारलं. मी होकार दिला. या शॉर्ट फिल्मसाठी मी त्याचा अभिनेता, स्पॉट बॉय, फायनान्स मॅनेजर सर्व होतो. पॅरेनॉया असं त्या सिनेमाचं नाव होतं. आम्हाला सिनेमा बनवायचा होता पण आमच्याकडे पैसे नव्हते."
"त्यावेळी आदित्यने सांगितलं की, याच बिल्डिंगमध्ये डॉ. श्रीराम लागू राहतात. आपण त्यांच्याकडे पैसे मागून बघूया. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी गेलो. तेव्हा आम्ही फक्त १४-१५ वर्षांचे होतो. कोणत्या कारणाने घरी आला आहात? असं डॉ. लागूंनी विचारलं. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही एक सिनेमा बनवतोय त्यासाठी आम्हाला पैसे हवेत. त्यांनी विचारलं किती? आम्ही सांगितलं १० हजार."
"त्यानंतर डॉ. लागू त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांनी १० हजार रुपये आम्हाला आणून दिले. हे घ्या आणि बनवा सिनेमा, असं ते आम्हाला म्हणाले. ही गोष्ट १९८०-८१ ची आहे. त्यावेळी दहा हजार खूप मोठी रक्कम होती. पण त्यांनी अगदी सहज आम्हाला हे पैसे दिले." अशाप्रकारे आमिरने सुरुवातीच्या काळात डॉ. लागूंनी कशी मदत केली, याचा खुलासा केला.