'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:18 IST2025-10-15T12:18:11+5:302025-10-15T12:18:54+5:30
Vijay Raj : 'कौआ बिर्याणी' हे नाव घेताच बॉलिवूड अभिनेता विजय राजचा चेहरा आपोआप डोळ्यासमोर येतो. 'रन' चित्रपटातील हा असा सहाय्यक अभिनेता आहे, जो थेट मुख्य नायकावर भारी पडला होता.

'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
'कौआ बिर्याणी' हे नाव घेताच बॉलिवूड अभिनेता विजय राजचा चेहरा आपोआप डोळ्यासमोर येतो. 'रन' चित्रपटातील हा असा सहाय्यक अभिनेता आहे, जो थेट मुख्य नायकावर भारी पडला होता. एका खास मुलाखतीत विजय राजने सांगितले की, तरुणपणी त्याला खाण्यापिण्यापासून ते आर्थिक बाबतीत इतक्या अडचणी होत्या की, त्याला साडीच्या दुकानातही काम करावे लागले होते.
विजय राजला चित्रपटसृष्टीत येऊन जवळजवळ तीन दशके उलटून गेली आहेत. या अभिनेत्याने २०१९ मध्ये वेब विश्वाची वाट धरली. सध्या तो अमेझॉन एमएक्स प्लेअरच्या 'जमनापार' सीझन २ या शोमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. अलीकडेच, या वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान विजय राजने 'स्क्रीन'ला मुलाखत दिली आणि सांगितले की अभिनयाचा त्याच्या आयुष्याशी कधीच काही संबंध नव्हता.
"तेव्हा मला पहिल्यांदा थिएटरबद्दल माहिती मिळाली..."
विजय राजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या तरुणपणीच्या संघर्षाबद्दल आणि थिएटरच्या दुनियेत प्रवेशाबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. विजय राजने सांगितले की, "मी लहानपणी अनेक छोटी-मोठी कामे करायचो." यावेळी त्याने परीक्षेत नापास झाल्याचा किस्साही सांगितला. तो म्हणाला की, "मी दिल्लीच्या ईव्हनिंग डीएव्ही कॉलेजमध्ये शिकत असताना १९ वर्षांचा होतो आणि तेव्हाच मला पहिल्यांदा थिएटरबद्दल माहिती मिळाली."
"सरकारी नोकऱ्याच होत्या सन्माननीय"
अभिनेत्याने सांगितले की, "हे सर्व अचानक घडले. मला कधीच या क्षेत्रात यायचे नव्हते. आयुष्य सुरळीत सुरू होते, मी अकाउंटंटची नोकरी करत होतो आणि संध्याकाळच्या कॉलेजमध्ये शिकत होतो. अचानक माझी थिएटर करणाऱ्या काही लोकांशी भेट झाली आणि मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला." सुरुवातीला त्याच्या कुटुंबाला वाटले की तो व्यस्त आहे, त्यामुळे ते खूश होते. पण जेव्हा त्यांना समजले की विजय कायमस्वरूपी हेच काम करणार आहे, तेव्हा समस्या निर्माण झाली. "माझे वडील सरकारी कर्मचारी होते. त्यावेळी, सरकारी नोकऱ्याच सन्माननीय मानल्या जात होत्या. जर तुम्हाला शिपाई म्हणूनही नियुक्त केले, तरी सरकार तुमचा मरेपर्यंत सांभाळ करत असे. माझ्या वडिलांनाही माझ्याकडून हीच अपेक्षा होती," असे विजय राजने सांगितले.
पेपरमध्ये लिहू शकला नाही एक शब्द
थिएटरबद्दल त्याच्या मनात इतके वेड निर्माण झाले की तो त्याच्या ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत नापास झाले. विजय म्हणाले, "मी बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात थिएटर करायला सुरुवात केली आणि मग माझा अभ्यासातील रस संपला. मी अंतिम वर्षात असताना माझा अर्थशास्त्राचा पेपर होता. मी थिएटरच्या या नव्या प्रेमात इतका हरवून गेलो होतो की, मला पेपर मिळाल्यावर मी एक शब्दही लिहू शकलो नाही. मी तिथेच बसून राहिलो आणि शिक्षकांना पेपर परत घेण्यास सांगितले. त्यांनी मला किमान ३० मिनिटं वाट पाहण्यास सांगितले आणि मी फक्त त्या पेपरवर माझे नाव लिहिले. माझ्या प्रामाणिकपणाची शिक्षक प्रशंसा करतील, असा माझा पूर्ण विश्वास होता, पण मी नापास झालो. मी पहिल्या दोन वर्षांतही नापास झालो होतो, त्यामुळे मी दोन्ही परीक्षा एकाच वेळी देत होतो."
'वयाच्या १५ व्या वर्षी काम करायला केली सुरुवात'
विजयने सांगितले की, त्याने १८ वर्षाचा असताना पैसे कमवायला सुरुवात केली होती. करोल बाग येथील साडीच्या दुकानात त्याची शेवटची नोकरी होती. तो म्हणाला, "मी तिथे पार्ट-टाईम काम करत असे. मी खूप वेगवेगळी कामे केली आहेत. आज, लोक १७ वर्षांच्या मुलांना 'बाळं' मानतात, आमच्या काळात, आम्ही १५ वर्षांचे असतानाच काम करायला सुरुवात केली होती."