"माझा चित्रपट तर हल्ल्यापूर्वी शूट झाला होता" IND vs PAK सामन्यावर दिलजीत दोसांझ म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:20 IST2025-09-26T12:19:10+5:302025-09-26T12:20:16+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने खेळले जात असताना दिलजीत दोसांझने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

"माझा चित्रपट तर हल्ल्यापूर्वी शूट झाला होता" IND vs PAK सामन्यावर दिलजीत दोसांझ म्हणाला...
Diljit Dosanjh On India Vs Pakistan Match: २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसारन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकार, सोशल मीडिया अकाउंट्वसवर बंदी घालण्यात आली. या साऱ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेला पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने 'सरदार जी ३'मध्ये पाकिस्तानी हानिया आमिरसोबत काम केल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. त्याला देशद्रोही म्हटले गेलं होतं. त्याची नागरिकता रद्द करण्याची मागणी केली होती. आता जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने खेळले जात आहेत, तेव्हा दिलजीतने यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओ क्लिपमध्ये दिलजीत दोसांझ भारतीय ध्वजाला (तिरंग्याला) सलाम करताना दिसत आहे. ध्वजाकडे पाहून तो म्हणतो, "हा माझ्या देशाचा ध्वज आहे. मला नेहमीच त्याचा आदर आहे. माझा 'सरदारजी ३' चित्रपट फेब्रुवारीमध्ये चित्रित झाला होता, पण सामने आता सुरू आहेत".
दिलजीत पुढे म्हणाला, "माझ्याकडे अनेक उत्तरे आहेत, पण मी गप्प आहे. त्या हल्ल्यानंतर आणि आजही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळावी अशी प्रार्थना करतो. फरक एवढाच आहे की माझा चित्रपट हल्ल्यापूर्वी चित्रित करण्यात आला होता आणि सामने हल्ल्यानंतर होत आहेत".
“Oh Mere Desh Da Jhanda Hai,” said Diljit Dosanjh. Amid the past Sardaar Ji 3 India-Pakistan controversy, Dosanjh broke his silence in Kuala Lumpur while commencing the first show of his Aura Tour. Addressing the audience, he spoke of love for India, respect for the national… pic.twitter.com/47ROMxIFOq
— Gagandeep Singh (@Gagan4344) September 24, 2025
दिलजीतने केवळ वादावरच नाही, तर माध्यमांवरही निशाणा साधला. तो म्हणाला, "राष्ट्रीय माध्यमांनी मला देशविरोधी म्हटले, पण शीख आणि पंजाबी समुदाय कधीही देशाविरुद्ध जाऊ शकत नाहीत". दरम्यान, 'सरदारजी ३' मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री असल्याने हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नव्हता. दिलजीतने तो परदेशात प्रदर्शित केला होता.