"मुस्लीम कुटुंबात माझ्यासारख्या बोल्ड सुनेला सांभाळणं कठीण"; प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:38 IST2025-10-23T11:35:41+5:302025-10-23T11:38:39+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने सासरच्या कुटुंबाबद्दल मोठं विधान केलंय. मुस्लीम कुटुंबात कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो,

"मुस्लीम कुटुंबात माझ्यासारख्या बोल्ड सुनेला सांभाळणं कठीण"; प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं विधान
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूजा बेदीने (Pooja Bedi) नुकतंच एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर खुलासा केला आहे. १९९० च्या दशकात एका पारंपरिक मुस्लीम कुटुंबात लग्न केल्यानंतर तिने चित्रपटसृष्टी का सोडली, याबद्दल आपलं मत मांडलं आहे. पूजाच्या स्पष्ट आणि परखड प्रतिक्रियेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुस्लीम कुटुंबात 'फिल्मी सून' स्वीकारणे कठीण
पूजा बेदीने फरहान फर्निचरवाला यांच्याशी लग्न केलं होतं. फरहान एका पारंपरिक मुस्लीम कुटुंबातून येतो. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत पूजा बेदीने सांगितलं की, फरहानच्या कुटुंबाला चित्रपटाच्या सेटवर जाणारी सून स्वीकारणं शक्य नव्हतं. ''मी फरहानशी लग्न केलं, जो एका पारंपरिक मुस्लीम कुटुंबातील होता. त्याच्या कुटुंबासाठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सुनेला स्वीकारणं कोणत्याही परिस्थितीत शक्य नव्हते.''
''१९९० च्या दशकात चित्रपटसृष्टीबद्दल अनेक अफवा आणि गैरसमज असायचे. प्रत्येक चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अभिनेत्रीचं नाव तिच्या हिरोशी जोडण्याचा प्रयत्न केला जायचा. माझी 'बोल्ड सून' (Sexy बहू) ही प्रतिमा त्यांच्यासाठी सांभाळणं खूप मोठं आव्हान होतं," असंही पूजाने स्पष्ट केलं.
पूजा बेदीने सांगितलं की, तिने स्वतः खोल विचार करुन चित्रपटसृष्टीतून दूर जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिच्या नवीन आयुष्याचा आणि सासरच्या कुटुंबाचा ती पूर्ण आदर आणि सन्मान करेल. ती म्हणाली, "मी विचार केला की, जर मला काही करायचं असेल, तर ते चांगलं आणि सासरच्या कुटुंबाचा पूर्ण आदर ठेऊन केलं पाहिजे. मला कुटुंबात जाऊन त्या लोकांना अस्वस्थ करायचं नव्हतं. त्यामुळे एकतर लग्न करू नका, किंवा त्या जगात स्वतःला जुळवून घ्या."
लग्नानंतर अनेक सिनेमांची पूजाला ऑफर होती. परंतु तिने काम न करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर, पूजाला वादग्रस्त 'कामसूत्र' (Kamasutra) जाहिरातीचा करार वाढवण्याच्या वेळेस मूळ मानधनापेक्षा आठपट जास्त रक्कम ऑफर करण्यात आली होती, पण तिने त्या जाहिरातीत काम करण्याचं नाकारलं.
आज मैत्रीचं नातं कायम
फरहान फर्निचरवाला यांच्याशी २००३ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतरही पूजा बेदी आणि फरहान यांच्यात मैत्रीचं नातं कायम आहे. त्यांना अलाया एफ (Alaya F) ही मुलगी आणि ओमर (Omar) नावाचा मुलगा आहे. पूजा बेदी सांगतात, "आम्ही दोघांनी नेहमी एकमेकांना आदर देण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. मला तर फरहानची सध्याची पत्नी लैला देखील खूप आवडते."