Dhurandhar Trailer: तुम्हारे पटाखे खत्म हो गए, तो में धमाका शुरु करु! रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा ४ मिनिटांचा जबरदस्त ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:06 IST2025-11-18T13:05:06+5:302025-11-18T13:06:18+5:30
Dhurandhar Trailer: रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'धुरंधर'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे

Dhurandhar Trailer: तुम्हारे पटाखे खत्म हो गए, तो में धमाका शुरु करु! रणवीर सिंगच्या 'धुरंधर'चा ४ मिनिटांचा जबरदस्त ट्रेलर
गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाची चांगलीच चर्चा होती. या सिनेमात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल अशी तगडी स्टारकास्ट असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. अशातच 'धुरंधर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तब्बल ४ मिनिटांचा हा ट्रेलर काळजाचा थरकाप उडवणारा आहे. इतकंच नव्हे तर पाकिस्तानला उद्देशून जबरदस्त संवाद ट्रेलरमध्ये दिसत आहेत.
'धुरंधर'च्या ट्रेलरमध्ये काय?
ट्रेलरच्या सुरुवातीला अर्जुन रामपाल दिसतो. ज्याच्या मनात १९७१ च्या युद्धानंतर भारताबद्दल प्रचंड राग आहे. तो त्याच्या गोडाऊनमध्ये एका व्यक्तीला लोखंडी सळ्यांनी बांधतो. हे दृश्य पाहून अंगावर काटा येतो. पुढे ट्रेलरमध्ये माधवन दिसतो. पाकिस्तानच्या स्वप्नात सुद्धा आपल्याबद्दल भीती असली पाहिजे, असं म्हणत तो एक मिशन राबवण्यासाठी उत्सुक असतो. त्यानंतर खुनशी असा अक्षय खन्ना दिसतो. कोणी चूक केली तर त्याला सोडणार नाही, अशा शब्दात अक्षय खन्ना एकाला वाईट पद्धतीने मारताना दिसतो.
पुढे संजय दत्त धडकी भरवणारा पोलीस ऑफिसर साकारताना दिसतो. ''जर मला धोका दिलास तर तुला मारण्याआधी *** बनवेल'', अशी ताकीद तो देताना दिसतो. ट्रेलरच्या सर्वात शेवटी रणवीर सिंग दिसतो. ''तुम लोगो के पटाखे खत्म हो गए तो में धमाका शुरु करु'', अशा शब्दात रणवीर सिंग पाकिस्तान शहरातील काही भाग जाळताना दिसतो. गुंडांचा बदला घेतो. एकूणच ४ मिनिटांचा हा ट्रेलर जबरदस्त आहे. ट्रेलर पाहून 'धुरंधर' बद्दलची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा सिनेमा ५ डिसेंबर २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.