'धुरंधर'च्या ट्रेलरमध्ये वाजली ६५ वर्षांपूर्वीची कव्वाली; शाहरुख खानशी आहे कनेक्शन, तुम्ही ऐकली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:00 IST2025-11-20T17:59:14+5:302025-11-20T18:00:59+5:30
'धुरंधर' ट्रेलरमध्ये दिसलेल्या या कव्व्लीची चर्चा आहे. ६५ वर्षांपूर्वी आलेली ही कव्वाली सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हुशारीने वापरण्यात आलीये

'धुरंधर'च्या ट्रेलरमध्ये वाजली ६५ वर्षांपूर्वीची कव्वाली; शाहरुख खानशी आहे कनेक्शन, तुम्ही ऐकली?
अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) बहुप्रतिक्षित 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या ॲक्शन-पॅक ट्रेलरच्या शेवटी वाजणाऱ्या एका कव्वालीने रसिकांचे लक्ष वेधले आहे. या कव्वालीचं शाहरुख खानशी खास कनेक्शन आहे.
'धुरंधर'च्या ४ मिनिटांच्या ट्रेलरचा शेवट 'ना तो कारवां की तलाश है' या प्रसिद्ध कव्वालीच्या दोन ओळींनी होतो. ही कव्वाली ६५ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९६५ साली आलेल्या 'बरसात की रात' या गाजलेल्या चित्रपटात वापरली गेली होती. या कव्वालीचे मूळ व्हर्जन पाकिस्तानी आहे, ज्याचे शीर्षक 'ना तो बुत कदे की तलब मुझे' असे होते.
या मूळ कव्वालीची निर्मिती दिग्गज कव्वाली गायक उस्ताद फतेह अली खान यांनी उस्ताद मुबारक अली खान यांच्यासोबत मिळून केली होती. 'बरसात की रात' या चित्रपटासाठी, संगीत दिग्दर्शक रोशन (हृतिक रोशनचे आजोबा) यांनी या पाकिस्तानी कव्वालीला बॉलिवूडच्या शैलीत नवा आकार दिला. १३ मिनिटांची ही गाजलेली कव्वाली प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिली.
तर, या कव्वालीला गायिका आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्ना डे यांनी आवाज दिला होता. या गाण्यात भारत भूषण आणि मधुबाला मुख्य भूमिकेत होते. आजही या कव्वालीची लोकप्रियता खूप मोठी आहे.
शाहरुख खानशी आहे खास नातं
या कव्वालीचा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानसोबतही खास संबंध आहे. एका मुलाखतीत शाहरुख खानला त्याचे आवडते गाणे कोणते असे विचारले असता, त्याने 'ना तो कारवां की तलाश है' हे आपले सर्वात आवडते गाणे असल्याचे सांगितले होते. ही कव्वाली केवळ 'धुरंधर'च्या ट्रेलरमध्येच आहे की चित्रपटामध्ये ती नव्याने वापरली जाणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.