'धुरंधर'मध्ये दाखवलेली रेहमान डकैतची हवेली कुठेय? दिवसाचं भाडं ऐकून डोळे विस्फारतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:37 IST2026-01-09T17:30:48+5:302026-01-09T17:37:38+5:30
'धुरंधर'मधील रेहमान डकैतची हवेली सेट नाही तर ऐतिहासिक वास्तू

'धुरंधर'मध्ये दाखवलेली रेहमान डकैतची हवेली कुठेय? दिवसाचं भाडं ऐकून डोळे विस्फारतील!
दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. चित्रपटातील रणवीर सिंगच्या 'हमजा अली मजारी' या भूमिके इतकीच चर्चा अक्षय खन्नाने साकारलेल्या 'रेहमान डकैत' या पात्राची होत आहे. आता या 'रेहमान डकैत'च्या चित्रपटात दाखवलेल्या आलिशान घराबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे.
चित्रपटाची कथा पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, रेहमान डकैतचे घर कराचीतील 'ल्यारी' भागात असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात हे चित्रीकरण पाकिस्तानात नसून भारतातील पंजाब राज्यातील अमृतसर येथे झाले आहे. अमृतसरमधील एका ऐतिहासिक हवेलीत शुटिंग झालं.
अमृतसरमधील या प्रसिद्ध हवेलीला 'लाल कोठी' म्हणून ओळखले जाते. या हवेलीचे केअरटेकर दीपक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक इमारतीत शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना दिवसाला ५०,००० रुपये भाडे द्यावे लागते. लेखक पीटर बेन्स यांच्या मते, ही कोठी १९ व्या शतकात (१८७६ मध्ये) एका उद्योगपतीने बांधली होती. सध्या ही इमारत एका ट्रस्टच्या मालकीची आहे.

'धुरंधर' आधी येथे ऋषी कपूर आणि रेखा यांच्या 'सादियां' चित्रपटाचेही शूटिंग झाले आहे. दरम्यान, चित्रपटप्रेमी जतिन मिथ्रानी यांनी या 'लाल कोठी'चा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत "ल्यारी फार दूर नाही" असे कॅप्शन दिले आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.