'धुरंधर' सिनेमाने 'कांतारा चाप्टर १'चा रेकॉर्ड मोडला! १८ दिवसांत जगभरात केली 'इतक्या' कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:15 IST2025-12-23T16:14:28+5:302025-12-23T16:15:41+5:30
२०२५ चा सिनेसृष्टीतील धुरंधर सिनेमा म्हणून रणवीरच्या सिनेमाकडे पाहिलं जातंय. या सिनेमाने छावा आणि कांताराचा रेकॉर्ड मोडला आहे

'धुरंधर' सिनेमाने 'कांतारा चाप्टर १'चा रेकॉर्ड मोडला! १८ दिवसांत जगभरात केली 'इतक्या' कोटींची कमाई
दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या १८ व्या दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला असून, 'धुरंधर'ने २०२५ मधील सर्वात मोठा भारतीय सुपरहिट चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे. रणवीर सिंग स्टारर या चित्रपटाने जगभरातील कमाईच्या बाबतीत विकी कौशलचा 'छावा' आणि ऋषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर १' यांसारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे.
बॉक्स ऑफिसवरील वादळी घोडदौड
'धुरंधर'ने अवघ्या १८ दिवसांत ९०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे, हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट 'अवतार: फायर अँड ॲश' प्रदर्शित झालेला असतानाही भारतीय प्रेक्षकांनी 'धुरंधर'लाच पहिली पसंती दिली आहे. 'अवतार ३'च्या आगमनानंतरही या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये फारशी घसरण झालेली नाही, जे बॉलिवूडसाठी चांगलं चित्र आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'छावा' आणि 'कांतारा: चॅप्टर १' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली होती. 'कांतारा चाप्टर १'ने जगभरात ८०० कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर 'छावा' सिनेमाने ८०७ कोटींची कमाई केली होती. मात्र, 'धुरंधर'ने आता या सर्वांचे रेकॉर्ड मोडले आहेत. धुरंधर लवकरच १००० कोटींचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कथेची मांडणी, कलाकारांचा अभिनय आणि सिनेमाला दिलेली देशप्रेमाची जोड यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
आदित्य धर यांच्या या ड्रीम प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंग एका गुप्तहेर एजंटच्या भूमिकेत आहे. त्याच्यासोबतच अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांसारख्या तगड्या स्टारकास्टने चित्रपटाची उंची वाढवली आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या साहसावर आधारित असलेली ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.सध्याची गती पाहता, 'धुरंधर' लवकरच ६०० कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या यशामुळे रणवीर सिंगच्या करिअरला मोठी कलाटणी मिळाली असून आदित्य धर यांनी पुन्हा एकदा आपली दिग्दर्शकीय पकड सिद्ध केली आहे.