'धुरंधर'साठी 'या' देशामध्ये उभारला ६ एकरचा भव्य सेट, वाचा त्यामागचं रंजक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:03 IST2025-12-29T16:03:01+5:302025-12-29T16:03:28+5:30
५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे.

'धुरंधर'साठी 'या' देशामध्ये उभारला ६ एकरचा भव्य सेट, वाचा त्यामागचं रंजक कारण
Why Dhurandhar Lyari Set Not Made In India : ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटानं जगभरात धुमाकूळ घातला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. चित्रपटातील १९९९ ते २००९ मधील पाकिस्तानमधील लियारी भागाचं वास्तव चित्रण प्रेक्षकांना भारावून टाकतंय. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? हा भाग भारतात किंवा पाकिस्तानात नव्हे, तर चक्क एका दुसऱ्याच देशात शूट झालाय.
पाकिस्तानातील 'लियारी' भाग दाखवण्यासाठी थायलंड देशातील बँकॉकमध्ये ६ एकरांचा भव्य सेट उभारला होता. अनेकांना प्रश्न पडला की 'लियारी'चा सेट मुंबईत का उभारला नाही? यावर प्रॉडक्शन डिझायनर सैनी एस. जोहरे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, "मुंबईत एवढ्या मोठ्या स्टारकास्टसोबत आणि पावसाळ्याच्या काळात ६ एकरचा भूखंड मिळवणं कठीण होतं. जुलैमध्ये चित्रीकरण करायचं असल्याने मुंबईचा पाऊस मोठा अडथळा ठरू शकला असता. त्यामुळे आम्ही बँकॉकची निवड केली".
बँकॉकमध्ये लियारीचा परिसर हुबेहूब उभा करण्यासाठी डिझायनर्सच्या टीमने सलग ३ महिने दररोज १२ तास काम केले. लियारी हे दहशतवाद, टोळीयुद्ध आणि ड्रग्ज व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. हे वातावरण जिवंत करण्यासाठी अत्यंत बारीक तपशीलांवर काम करण्यात आले. चित्रपटात दिवसाला सरासरी ४ लोकेशन्सवर शूट करण्यात आले, जे कोणत्याही प्रॉडक्शन डिझायनरसाठी एक मोठे आव्हान होते.

लियारी हा भाग अतिशय गुंतागुंतीचा अल्याने इंटरनेटवर तिथल्या घरांच्या आतील भागांचे फोटो उपलब्ध नव्हते. त्यामुळे सैनी आणि त्यांच्या टीमने, जुन्या वर्तमानपत्रातील कात्रणे तपासली, जुने व्हिडीओ आणि रिपोर्ट शोधले. तिथल्या लोकांचा इतिहास, भूगोल आणि अगदी ते वापरत असलेल्या शस्त्रांची माहिती गोळा केली. या सखोल संशोधनामुळेच चित्रपटातील सेट इतका वास्तववादी वाटतो की प्रेक्षकांना तो थायलंडमध्ये उभारला गेलाय, हे जाणवत नाही.
पाकिस्तानमधील 'लियारी' भागाचा सेट बँकॉकला उभरला असला, तरी चित्रपटातील इतर महत्त्वाच्या दृश्यांसाठी निर्मात्यांनी भारताचा कानाकोपरा पालथा घातला. चित्रपटातील काही अत्यंत महत्त्वाचे सीक्वेन्स लडाखमध्ये चित्रित करण्यात आले आहेत. चित्रपटात पाकिस्तानमधील ग्रामीण भागाचं दर्शन घडवण्यासाठी पंजाबमधील लुधियाना जवळ असलेल्या खैरा गावाची निवड करण्यात आली होती. या गावातील घरांची रचना आणि ग्रामीण पोत पाकिस्तानच्या सीमावर्ती भागासारखा असल्याने तिथे हुबेहूब वातावरण तयार करण्यात आले. चित्रीकरणादरम्यान या गावातील घरांच्या छतावर चक्क पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आले होते, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि काही काळ गोंधळही उडाला होता. तर चित्रपटातील काही महत्त्वाचे ॲक्शन सीन्स डोंबिवली आणि भिवंडीला जोडणाऱ्या माणकोली-डोंबिवली पुलावर शूट झाले.