या कारणामुळे धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून लवकर दिला डिस्चार्ज, 'ही मॅन'च्या डॉक्टरांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:02 IST2025-11-13T12:01:49+5:302025-11-13T12:02:58+5:30
Actor Dharmendra : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ८९ वर्षीय अभिनेते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते.

या कारणामुळे धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून लवकर दिला डिस्चार्ज, 'ही मॅन'च्या डॉक्टरांचा खुलासा
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना १२ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ८९ वर्षीय अभिनेते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले की, धर्मेंद्रजींना सकाळी साडेसात वाजता डिस्चार्ज देण्यात आला. कुटुंबाची इच्छा आहे की, त्यांचे उपचार घरातूनच सुरू ठेवावेत. धर्मेंद्र यांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज देण्यामागे काही कारण आहे का? की त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांची इच्छा होती की धर्मेंद्र यांना घरी परत घेऊन यावे? यावर आता डॉक्टर प्रतित समदानी यांनी उत्तर दिले आहे.
धर्मेंद्र यांना १० नोव्हेंबर रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे ते डॉक्टरांच्या सततच्या देखरेखेखाली होते. धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर हलवल्याची बातमीही आली होती. धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा पसरल्यावर मात्र खळबळ उडाली होती. यावर अभिनेत्याचे कुटुंब खूप संतापले. हेमा मालिनी यांनी याला गैरजबाबदार वर्तन म्हटले. नंतर मुलगा सनी देओलच्या टीमने त्यांच्या आरोग्याविषयी अपडेट दिले की, धर्मेंद्रजींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे आणि त्यांच्यावर उपचारांचा चांगला परिणाम होत आहे. त्यानंतर काही तासांतच धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
डॉक्टर म्हणाले...
डॉ. प्रतित समदानी यांनी विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, धर्मेंद्र यांचे दोन्ही मुलं सनी आणि बॉबी देओल आणि पत्नी प्रकाश कौर यांची इच्छा होती की धर्मेंद्र घरी परत यावेत आणि त्यांच्यासोबत वेळ घालवावा. त्यामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. प्रतित समदानी म्हणाले, "स्पष्टपणे, काही कारणामुळे दोन्ही भाऊ आणि त्यांची आई प्रकाश कौर यांची इच्छा होती की धर्मेंद्र यांनी त्यांच्या घरी परतावे आणि तिथे त्यांच्यासोबत राहावे, जिथे त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग घालवला आहे."
कुटुंबाने घेतला निर्णय
डॉक्टरांनी पुढे म्हटले, "या संकटाच्या काळात आम्ही देओल कुटुंबासोबत आहोत आणि धर्मेंद्रजींचे आरोग्य लवकर ठीक व्हावे यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो." प्रतित समदानी यांनी पुढे सांगितले की, सनी, बॉबी आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या वडिलांच्या उपचारादरम्यान त्यांना आरामदायी वाटावे यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था आणि खबरदारी घेत होते. प्रतित समदानी यांनी सांगितले की, कुटुंबाने निर्णय घेतला की धर्मेंद्र यांचे उपचार डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरीच केले जातील.
दरम्यान, धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर कुटुंबाने एक निवेदन जारी केले होते की, कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि कोणत्याही प्रकारचे तर्क किंवा अटकळ लावू नये. त्यांनी सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनेबद्दल आभारही मानले होते.
हेमा मालिनींनी दिली धर्मेंद्र यांची हेल्थ अपडेट
धर्मेंद्र यांची तब्येत आता कशी आहे आणि घरी काय वातावरण आहे, याचा अपडेट देताना हेमा मालिनी यांनी सुभाष के. झा यांना सांगितले, "हा माझ्यासाठी अजिबात सोपा काळ नाही. धरमजींची तब्येत ही आमच्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्यांची मुले रात्रभर झोपू शकलेली नाहीत. मी या क्षणी कमकुवत पडू शकत नाही. खूप जबाबदाऱ्या आहेत. पण हो, ते घरी परत आले याचा मला आनंद आहे. ते रुग्णालयातून बाहेर आले याचे समाधान आहे. या वेळी त्यांना त्यांच्या लोकांमध्ये राहण्याची गरज आहे आणि बाकी सर्व काही वरच्या देवाच्या हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा."