धर्मेंद्र यांच्या चाहत्यांचा 'हाऊसफुल्ल' प्रतिसाद! 'इक्कीस'ने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:05 IST2026-01-02T11:03:22+5:302026-01-02T11:05:16+5:30
धर्मेंद्र यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. त्यामुळेच इक्कीसच्या कमाईत चांगलीच वाढ झालेली दिसतेय

धर्मेंद्र यांच्या चाहत्यांचा 'हाऊसफुल्ल' प्रतिसाद! 'इक्कीस'ने पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'इक्कीस' (Ikkis) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आश्वासक सुरुवात केली आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि नवोदित अभिनेता अगस्त्य नंदा यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळवला आहे. विशेष म्हणजे, बॉक्स ऑफिसवर सध्या 'धुरंधर' चित्रपट तुफान यश मिळवत असतानाच 'इक्कीस'ची सुरुवात नक्कीच चांगली म्हणता येईल.
'इक्कीस'ने किती पैसे कमावले?
सैकनिल्कने दिलेल्या अहवालानुसार, 'इक्कीस' सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल ७ कोटींची कमाई केली आहे. सकाळच्या शोला 'इक्कीस'ला थंड प्रतिसाद होता. परंतु दुपारी आणि संध्याकाळी असलेले शो बघायला प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी केली. इतकंच नव्हे, धर्मेंद्र यांना शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या वॉर-ड्रामा चित्रपटात अगस्त्यने परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून, पहिल्या दिवसाच्या कमाईवरून प्रेक्षकांनी 'इक्कीस'ला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत भावनिक आहे, कारण हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. धर्मेंद्र यांच्या भूमिकेने पुन्हा एकदा मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्यासोबत जयदीप अहलावत, सिमर भाटिया, सिकंदर खेर यांचीही महत्त्वाची भूमिका असून त्यांच्या अभिनयाचंही समीक्षकांनी कौतुक केले आहे.