सलमान, शाहरुख, गोविंदा..सेलिब्रिटींनी रात्रीच घेतली धर्मेंद्र यांची भेट; अमिषा पटेलला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:04 IST2025-11-11T10:03:38+5:302025-11-11T10:04:25+5:30
धर्मेंद्र यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी काल रात्री अनेक सेलिब्रिटीं ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते

सलमान, शाहरुख, गोविंदा..सेलिब्रिटींनी रात्रीच घेतली धर्मेंद्र यांची भेट; अमिषा पटेलला अश्रू अनावर
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक आहे. काही दिवसांपासून ते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. तर काल धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याची बातमी आली. यानंतर रात्रीच सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा हे काही सेलिब्रिटी रुग्णालयात पोहोचले. ब्रीच कँडी बाहेरील व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
सलमान खान हा धर्मेंद्र यांचा अत्यंत लाडका होता. अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये दोघांचा छान बाँड पाहायला मिळाला होता. धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याचं कळताच बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी रात्री रुग्णालयात पोहोचले. धर्मेंद्र यांची मुलं, सूना आधीच रुग्णालयात आले होते. नंतर शाहरुख खान, सलमान खान, गोविंदा, अमिषा पटेल यांनी रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र यांची भेट घेतली. बाहेर पडताना सलमान खानचा निराश चेहरा होता. तर अमिषा पटेलला अश्रू अनावर झाले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल काही वेळापूर्वीच ईशा देओलने पोस्ट शेअर करत माहिती दिली. 'माझे वडील ठीक आहेत आणि बरे होत आहेत. आमच्या कुटुंबाला प्रायव्हसी द्यावी ही विनंती. बाबांसाठी सगळे प्रार्थना करत आहेत त्यासाठी सर्वांचे आभार.'
धर्मेंद्र ८९ वर्षांचे आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. आगामी हिंदी सिनेमा 'इक्कीस'मध्ये धर्मेंद्र यांची भूमिका आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाच्या आजोबांची त्यांनी भूमिका साकारली आहे.