'ही-मॅन' धर्मेंद्र घरी परतले, चाहत्यांच्या आनंदाला उधाण; म्हणाले- "आमच्या प्रार्थना कामी आल्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:31 IST2025-11-12T09:29:47+5:302025-11-12T09:31:45+5:30
Actor Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र यांना अखेरीस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता ते स्वस्थ झाल्याची बातमी ऐकून चाहते खूश झाले आहेत.

'ही-मॅन' धर्मेंद्र घरी परतले, चाहत्यांच्या आनंदाला उधाण; म्हणाले- "आमच्या प्रार्थना कामी आल्या..."
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची सोमवारपासून प्रकृती खूपच खालावली होती. ते गेल्या अनेक दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होते. याच दरम्यान, त्यांची मुलगी ईशा देओलने त्यांच्या आरोग्याची माहिती दिली होती. आता अखेरीस त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ही बातमी सोशल मीडियावर येताच चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
अभिनेते धर्मेंद्र यांना अखेरीस रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता ते स्वस्थ झाल्याची बातमी ऐकून चाहते खूश झाले आहेत. ते लवकर बरे व्हावेत, यासाठी सोशल मीडियावर चाहते प्रार्थना करत होते आणि आता जेव्हा ते घरी परतले आहेत, तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
आमच्या प्रार्थना कामी आल्या
धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त करायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले, "चला, आमच्या प्रार्थना कामी आल्या. परमेश्वर धर्मेंद्रजींना दीर्घायुष्य देवो." तर, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, "आता सुटकेचा श्वास घेता येईल, धरम पाजी तुम्ही एक लिजेंड आहात." अॅम्बुलन्समधून घरी जातानाचे धर्मेंद्र यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
निधनाच्या पसरल्या होत्या खोट्या बातम्या
एक दिवसापूर्वी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी स्वतः पुढे येऊन या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. हेमा मालिनी यांनी एक्स अकाउंटवर लिहिले होते, "अशा अफवा पसरवणे अत्यंत गैरजबाबदारपणाचे आहे. धरम जी ठीक आहेत आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत."