धनुष व क्रिती सनॉन यांचा 'तेरे इश्क में' 'या' तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित; कुठे पाहायचा? वाचा…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:19 IST2026-01-19T19:18:53+5:302026-01-19T19:19:56+5:30
'तेरे इश्क में' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख आली समोर

धनुष व क्रिती सनॉन यांचा 'तेरे इश्क में' 'या' तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित; कुठे पाहायचा? वाचा…
Tere Ishk Mein OTT Release : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका असलेला 'तेरे इश्क में' हा चित्रपट सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे निर्मात्यांवर ८४ कोटी रुपयांचा खटला दाखल झाला आहे.
गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता हा चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नेटफ्लिक्सच्या 'कमिंग सून' विभागात या चित्रपटाचे नाव झळकले असून, मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार, २३ जानेवारी रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाणार आहे.
काय आहे ८४ कोटींचा वाद?
बॉक्स ऑफिसवर यश मिळवूनही हा चित्रपट कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. 'इरॉस इंटरनॅशनल मीडिया लिमिटेड'ने दिग्दर्शक आनंद एल. राय आणि त्यांच्या 'कलर येलो मीडिया' विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. इरॉसचा असा दावा आहे की, हा चित्रपट 'रांझणा' या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत आहे. याप्रकरणी इरॉसने तब्बल ८४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. या खटल्यात नेटफ्लिक्स आणि टी-सीरीजलाही ओढण्यात आले आहे.
बॉक्स ऑफिसवर गाजवला डंका
६५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं देशांतर्गत ११२ कोटींहून अधिक तर जगभरात १६० कोटींचा टप्पा पार केलाय. धनुष आणि आनंद एल. राय यांची ही जोडी 'रांझणा' आणि 'अतरंगी रे' नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.