करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:41 IST2025-11-15T11:32:07+5:302025-11-15T11:41:05+5:30
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरु असलेला वाद थांबवण्याचे नाव घेत नाहीये.

करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
Sanjay Kapoor Property Dispute: दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून वाद वाढत चालला आहे. संजय कपूर यांची पहिली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुलांबाबत केलेल्या दाव्यामुळे निर्माण झालेला कायदेशीर वाद आता दिल्ली उच्च न्यायालयात अधिक तीव्र होत आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना थेट शब्दांत या सुनावणीला नाटकीय स्वरूप देण्यात येऊ नये सांगितले आहे.
संजय कपूर यांची मालमत्ता त्यांची सध्याची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांना पूर्णपणे हस्तांतरित करण्यावर आक्षेप घेणारी याचिका करिश्मा कपूरच्या मुलांनी दाखल केली आहे. याचिकेमध्ये त्यांनी प्रिया कपूर यांच्यावर वडिलांच्या मृत्युपत्रात फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत, करिश्मा कपूरच्या मुलांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी थेट आरोप केला की, करिश्मा कपूरची मुलगी अमेरिकेतील एका विद्यापीठात शिक्षण घेत आहे, पण गेल्या दोन महिन्यांपासून तिची फी भरली गेलेली नाही.
जेठमलानी यांनी कोर्टाला सांगितले की, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटाच्या करारानुसार, संजय कपूरने मुलांच्या शिक्षण आणि खर्चाची जबाबदारी घेतली होती. जेठमलानी यांनी दावा केला की "मुलांची मालमत्ता आजही प्रिया कपूर यांच्याकडे आहे. त्यामुळे फी भरणे ही त्यांची जबाबदारी आहे." या आरोपाला प्रिया कपूर यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील राजीव नायर यांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, मुलांचा सर्व खर्च प्रिया कपूरने उचलला आहे आणि हा दावा निराधार आहे. नायर यांनी कोर्टात हा मुद्दा उचलण्यामागचा उद्देश माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवणे हाच असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
कोर्टाने स्पष्ट शब्दात दिला दम
न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी मुलांच्या फीसंदर्भातील या वादविवादावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी दोन्ही पक्षांना सक्त ताकीद दिली की, अशा प्रकारचे वैयक्तिक मुद्दे न्यायालयात येऊ नयेत. "मला यावर ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. हा प्रश्न माझ्या कोर्टात पुन्हा येऊ नये. ही सुनावणी नाटकीय होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. मी ही जबाबदारी तुमच्यावर टाकते", असं मी ही जबाबदारी न्यायमूर्ती ज्योती सिंह म्हणाल्या.
कोर्टाने प्रिया कपूर यांच्या बाजूने असलेल्या ज्येष्ठ वकील श्येल त्रेहान यांना स्पष्ट निर्देश दिले की, त्यांनी खात्री करावी की यापुढे फी किंवा खर्चासारखे प्रश्न कोर्टासमोर पुन्हा येणार नाहीत. कोर्टाने या समस्येची जबाबदारी थेट प्रिया कपूर यांच्या वकिलांवर सोपवली.
दरम्यान, सध्या दिल्ली हायकोर्टात करिश्मा कपूरच्या मुलांनी दाखल केलेल्या अर्जावर युक्तिवाद ऐकत आहे. या अर्जाद्वारे त्यांनी प्रिया कपूर यांना संजय कपूर यांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यापासून थांबवण्याची मागणी केली आहे. २१ मार्च २०२५ रोजीच्या मृत्युपत्रानुसार, संजय कपूर यांची संपूर्ण वैयक्तिक मालमत्ता प्रिया सचदेव कपूर यांना देण्याची तरतूद आहे. प्रिया कपूर यांचे वकील राजीव नायर यांनी कोर्टात पुन्हा एकदा या मृत्युपत्राची वैधता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि हे मृत्युपत्र कुटुंबाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही शेअर करण्यात आले होते, असे सांगितले. कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.