देशमुखांच्या घरात मुलं वर्षानुवर्षे जपतात 'ही' परंपरा, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 11:50 IST2026-01-19T11:34:07+5:302026-01-19T11:50:11+5:30
वारसा केवळ संपत्तीचा नाही, तर संस्कारांचा!

देशमुखांच्या घरात मुलं वर्षानुवर्षे जपतात 'ही' परंपरा, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक
महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लेक म्हणजेच रितेश देशमुख आणि सून जिनिलिया देशमुख यांच्या मुलांच्या संस्कारांचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्र नेहमीच करत असतो. मात्र, आता देशमुख कुटुंबातील दुसऱ्या सुनबाई म्हणजेच धिरज देशमुख यांच्या पत्नी दीपशिखा देशमुख यांनी शेअर केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या निधनाला अनेक वर्षे उलटली असली, तरी त्यांच्या तिसऱ्या पिढीच्या हृदयात आजही 'आजोबा' जिवंत आहेत, याची प्रचिती या पोस्टमधून येते.
दीपशिखा यांनी सोशल मीडियावर मुलांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मुलांनी जिंकलेली मेडल्स घेऊन दिवंगत विलासराव देशमुख यांच्या फोटोसमोर ठेवलेली दिसत आहेत. घरातील लहान मुले जेव्हा जेव्हा खेळात किंवा अभ्यासात यश मिळवतात, तेव्हा ते कोणाच्याही सांगण्याशिवाय आपले मेडल थेट दिवंगत विलासराव देशमुखांच्या फोटोसमोर ठेवतात, असं दिपशिखा यांनी सांगितलं.
ही पोस्ट शेअर करताना दीपशिखा भावूक झाल्या. त्या म्हणतात, "ही आमच्या घरची परंपराच आहे. मुले जेव्हा मेडल्स जिंकून येतात, तेव्हा ते कोणाच्याही सांगण्याशिवाय आपला विजय आजोबांना समर्पित करतात. एक आई म्हणून लोक मला विचारतात की तुम्ही त्यांना हे शिकवले आहे का? पण हे असं निस्वार्थ प्रेम शिकवता येत नाही. हे त्यांना परंपरेने मिळालेलं आहे, हे त्यांच्यामध्ये जन्मजातच आहे".
दीपशिखा यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.विलासराव देशमुखांच्या संस्कारांचा वारसा मुलं अमित-रितेश-धिरज यांच्यानंतर आता त्यांची नातवंडही तितक्याच अभिमानाने पुढे नेत असल्याचे पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.