विदेशात 'धुरंधर' पती रणवीरसाठी दीपिकाने आपल्या हातानं बनवला 'हा' मराठी पदार्थ, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:21 IST2026-01-01T13:20:03+5:302026-01-01T13:21:15+5:30
दीपिकाने पतीसाठी खास मराठी पदार्थ बनवला.

विदेशात 'धुरंधर' पती रणवीरसाठी दीपिकाने आपल्या हातानं बनवला 'हा' मराठी पदार्थ, पाहा व्हिडीओ
Deepika Padukone Prepares Modak : बॉलिवूडचं पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या जोडीने काल प्रसिद्ध भारतीय शेफ विकास खन्ना यांच्या 'बंगलो' या रेस्टॉरंटला भेट दिली. यावेळी दीपिकाने चक्क आपल्या हाताने मराठमोळा पदार्थ मोदक बनवून सर्वांना चकित केलं. हे सेलिब्रेशन केवळ नववर्षाचं नाही तर रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशासाठीही होतं. 'धुरंधर' या चित्रपटाने जगभरात १,१०० कोटींहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचला आहे. याच आनंदात दीपिकाने पतीसाठी हा खास मराठी पदार्थ बनवला.
विकास खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विकास खन्ना दीपिकाला मोदक कसा बनवायचा, याचे प्रशिक्षण देताना दिसत आहेत. दीपिकाने अत्यंत उत्साहाने तिचा पहिला मोदक बनवला. तर बाजूला उभा असलेला रणवीर तिला प्रोत्साहन देताना दिसला. यानंतर विकास खन्ना यांनी स्वतः या जोडीला आपल्या हाताने ताजे मोदक भरवले.
विकास खन्ना यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं, "२०२५ चा हा सर्वात सुंदर शेवट... भारताच्या सन्मानार्थ एक नवीन सुरुवात... टीम बंगलोला रणवीर आणि दीपिकाचा पहिला मोदक सेलिब्रेट करता आला. आज बंगलोमध्ये येणाऱ्या आमच्या सर्व पाहुण्यांना २०२६ च्या नव्या सुरुवातीसाठी डाळिंब आणि वेलचीचे मोदक खाण्याचा आनंद घेता येईल. जेणेकरून २०२६ ची सुरुवात शुभ आणि मंगल होईल. जगभर धुमाकुळ घालणाऱ्या 'धुरंधर'चे यश साजरं केलं. मोदक हा भगवान गणेशांना अर्पण केला जाणारा गोड पदार्थ आहे. तो शुभारंभ, समृद्धी, बुद्धी आणि आशीर्वाद यांचे प्रतीक मानला जातो. तर डाळिंब अनेक संस्कृतींमध्ये आरोग्य आणि कल्याणासाठी पवित्र मानले जाते. माझ्या आई-वडिलांच्या लग्नाच्या फोटोसमोर उभं राहून, सिद्धिविनायक मंदिरातून नुकतेच आणलेल्या साच्यांमधून मोदक तयार केलाय… मी खरंच भारावून गेलो आहे", या शब्दात विकास खन्ना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दीपिका आणि रणवीरचे आगामी सिनेमे
'फायटर' आणि 'कल्की २८९८ एडी'च्या यशानंतर दीपिका आता मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ती लवकरच शाहरुख खानसोबत 'किंग' मध्ये दिसणार आहे. तसेच साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक ॲटली यांच्या आगामी चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका असणार आहे. तर रणवीर सिंग 'धुरंधर'नंतर 'धुरंधर २'मध्ये पाहायला मिळणार आहे. रणवीरच्या 'डॉन ३'साठीही त्याचे चाहते उत्सुक होते. पण, रणवीर सिंगने स्वतःला 'डॉन ३' पासून वेगळे केले आहे. 'डॉन ३' मधून बाहेर पडल्यानंतर रणवीरने आपला मोर्चा जय मेहता यांच्या 'प्रलय' या चित्रपटाकडे वळवला आहे.