‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:29 IST2025-08-16T16:53:48+5:302025-08-16T17:29:39+5:30
The Bengal Files: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द बंगाल फाईल्स या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान, कोलकात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. या गोंधळामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चित्रपटगृह सोडून जावं लागलं.

‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द बंगाल फाईल्स या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान, कोलकात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला. या गोंधळामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चित्रपटगृह सोडून जावं लागलं. पश्चिम बंगाल सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विवेक अग्निहोत्री यांनी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या द बंगाल फाईल्स या चित्रपटाचा ट्रेलर कोलकातामध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय़ घेतला होता. हा ट्रेलर एका चित्रपटगृहामधून लॉन्च करण्यात येणार होता. मात्र विवेक अग्निहोत्री जेव्हा कोलकात्यामध्ये पोहोचले. तेव्हा हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी एका खाजगी हॉटेलमध्ये त्यांनी या चित्रपटाची स्क्रिनिंग ठेवण्यात आली. मात्र तिथेही गोंधळ झाला. मात्र या सर्व गोंधळानंतरही द बंगाल फाईल्सचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
या गोंधळानंतर विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आमच्या चित्रपटामध्ये गोंधळ घालण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही आहे. अशा परिस्थितीत कार्यक्रम रद्द करणे आणि त्यात गोंधळ होणे ही हुकूमशाही आहे, असा आरोप विवेक अग्निहोत्री यांनी केला.
द बंगाल फाईल्सच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी ह्यासुद्धा पोहोलच्या होत्या. मात्र गोंधळाच्या परिस्थितीमुळे या दोघांच्याही सुरक्षेसाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. ज्या पद्धतीने या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम रोखण्यात आला ते मला आवडलेलं नाही, या शहरात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.