ब्लॉकबस्टर सिनेमा देऊनही ‘या’ अभिनेत्याला कुणी देईना काम, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 16:11 IST2019-09-23T14:19:59+5:302019-09-23T16:11:41+5:30
बहुतांश लोक ‘या’ अभिनेत्याला सहअभिनेता म्हणून ओळखतात. पण अनेक चित्रपटांत तो मुख्य अभिनेता म्हणून झळकला आहे.

ब्लॉकबस्टर सिनेमा देऊनही ‘या’ अभिनेत्याला कुणी देईना काम, पण...
80 व 90 च्या दशकातला बहुचर्चित अभिनेता चंकी पांडे सध्या ‘प्रस्थानम’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात संजय दत्त, मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, अली फजल, अमायरा दस्तूर असे अनेक स्टार्स आहेत. चंकी पांडे हाही या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. बहुतांश लोक चंकीला सहअभिनेता म्हणून ओळखतात. पण मुख्य अभिनेता म्हणून अनेक चित्रपटांत तो झळकला आहे. अर्थात एक वेळ अशीही आली की, कुणीही चंकीला काम देईना.
एका ताज्या मुलाखतीत चंकी यावर बोलला. ‘1993 मध्ये आंखे सारखा हिट चित्रपट दिल्यानंतरही माझ्याकडे काम नव्हते. वर्षभर मी रिकामा घरी बसलो होतो. माझ्याजवळ ‘तिसरा कौन’ हा एकच चित्रपट होता. अशात मला बांगलादेशात काम करण्याची संधी मिळाली. तिथे माझा पहिलाच चित्रपट हिट झाला. त्यामुळे पुढची चार-पाच वर्षे मी बांगलादेशात काम केले. लग्नानंतर मात्र माझ्या पत्नीच्या सल्ल्याने मी बॉलिवूडमध्ये परतलो. पण नवीन पीढी जवळजवळ मला विसरली होती. तिथून माझा नवा संघर्ष सुरु झाला.
मी लोकांना भेटायचो. त्यांना काम मागायचो. नशीबाने मला काम मिळाले. हॅरी बावेजा, सुभाष घई, साजिद नाडियाडवाला यांनी मला मदत केली. माझ्यामते, कुठल्याही कलाकाराला काम मागायची लाज वाटता कामा नये. यशाची चव चाखल्यानंतर अचानक घरी बसण्याची वेळ आलीच तर तुम्ही तणावात जातात. पण यावर मात करता येते. मी मिळेल त्या भूमिका केल्यात. इव्हेंट कंपनी उघडली, एक रेस्टॉरंट सुरू केले. मी स्वत:ला अनेक प्रकारे बिझी केले,’ असे त्याने सांगितले.
चंकी पांडे लवकरच ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात दिसणार आहे.