'बॉर्डर' फक्त सिनेमा नाही, तर एक आत्मविश्वास; वरुण धवनने सांगितलं देशभक्तीपर सिनेमांचं महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:16 IST2026-01-05T16:14:36+5:302026-01-05T16:16:14+5:30
अभिनेता वरुण धवन सध्या बॉर्डर-२ सिनेमामुळे चर्चेतला चेहरा ठरत आहे. या आगामी चित्रपटातील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतंच भारत-पाक सीमेवर भारतीय सैन्याच्या जवानांच्या साक्षीनं प्रदर्शित करण्यात आलं.

'बॉर्डर' फक्त सिनेमा नाही, तर एक आत्मविश्वास; वरुण धवनने सांगितलं देशभक्तीपर सिनेमांचं महत्त्व!
अभिनेता वरुण धवन सध्या बॉर्डर-२ सिनेमामुळे चर्चेतला चेहरा ठरत आहे. या आगामी चित्रपटातील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतंच भारत-पाक सीमेवर भारतीय सैन्याच्या जवानांच्या साक्षीनं प्रदर्शित करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात वरुण धवननं अतिशय महत्त्वाचं विधान केलं. "बॉर्डर हा एक फक्त चित्रपट नव्हता तर या चित्रपटाने संपूर्ण देशातील तरुण पिढीला आत्मविश्वास दिला. तरुणाईतील साहस जागृत करणारा ठरला. भारत किती मजबूत आणि बलवान देश आहे ते बॉर्डर सिनेमाने तेव्हा दाखवून दिलं होतं. अशा ऐतिहासिक सिनेमाच्या सिक्वलमध्ये काम करण्याची संधी मिळेल असा कधी विचार देखील केला नव्हता. बॉर्डर-२ सिनेमाचा भाग होता आलं हे मी भाग्य समजतो", असं वरुण धवन म्हणाला.
वरुणने भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. 'घर कब आओगे' गाण्याच्या लॉन्चिंग कार्यक्रमावेळी कार्यक्रमस्थळी ऑपरेशन सिंदूरचे पोस्टर लावले गेले होते. ते पोस्टर पाहून वरुण धवनने उपस्थित भारतीय सैन्यातील जवानांचे साहसी कामगिरीसाठी आभार मानले आणि महत्त्वपूर्ण विधान केलं. तो म्हणाला, "इथं उभं राहून जेव्हा मी ऑपरेशन सिंदूरचे पोस्टर पाहिले तेव्हा खूप अभिमान वाटला. आपला देश शांतिप्रीय देश आहे. पण त्यासोबतच बॉर्डर सारखे चित्रपटही सध्याच्या काळात बनले गेले पाहिजेत. कारण या चित्रपटांच्या माध्यमातून तरुणाईला संदेश देता येतो की आपण शांतिप्रीय असलो तरी आपल्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर जशास तसं उत्तर देण्यासाठीही आपला देश सज्ज असतो. कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्याची धमक आपला देश ठेवतो"
1971 सालच्या युद्धाचा उल्लेख करत वरुणने भारत जर एखाद्या दुसऱ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो तर स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी देखील लढू शकतो, असं म्हटलं. कार्यक्रमाच्या शेवटी वरुणने आपल्या 'बॉर्डर-२' सिनेमातील डायलॉग ऐकवून उपस्थितांमध्ये जोश भरला. "इस बार हम बॉर्डर में घुसेंगेही नहीं, हम बॉर्डरही बदल देंगे", असं वरुण म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कटकडाट करत प्रतिसाद दिला.