बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण? कपूर, बच्चन, खान दुसऱ्या क्रमांकावरही नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:16 IST2025-10-17T13:15:50+5:302025-10-17T13:16:10+5:30
अमिताभ बच्चन यांचे कुटुंब अंदाजे ४,५०० कोटींच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण? कपूर, बच्चन, खान दुसऱ्या क्रमांकावरही नाही!
बॉलिवूड म्हटले की डोळ्यासमोर येते ग्लॅमर, स्टारडम आणि कोट्यवधींची संपत्ती कमावणारी कपूर (Kapoor), बच्चन (Bachchan) किंवा चोप्रा (Chopra) ही कुटुंबे. या घराण्यांनी अनेक दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले आहे. मात्र, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या शर्यतीत यापैकी कोणीही पहिल्या क्रमांकावर नाही.
बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबाच्या यादीत टी-सीरिजचे कुमार कुटुंब अव्वल स्थानी आहे. भूषण कुमार आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे १०,००० कोटी इतकी आहे, जी बॉलिवूडमधील इतर सर्व प्रमुख कुटुंबांना मागे टाकते. भूषण कुमार हे टी-सीरीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचे काका कृष्ण कुमार यांच्यासोबत ते हे विशाल साम्राज्य सांभाळतात. संगीतापासून सुरू झालेला हा वारसा आता चित्रपट निर्मिती आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेगाने विस्तारला आहे.
गुलशन कुमार यांनी रोवलेले बीज
या साम्राज्याची सुरुवात १९८३ मध्ये गुलशन कुमार यांनी केली. ज्या काळात संगीत कॅसेट्सची लोकप्रियता वाढत होती, त्याच काळात गुलशन कुमार यांनी त्यांच्या व्यावसायिक बुद्धिमत्तेने संगीत प्रत्येक घराघरात पोहोचवले. 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातील गाण्यांमुळे टी-सीरिजला ओळख मिळाली. त्यानंतर आलेल्या 'आशिकी' चित्रपटाचे संगीत रेकॉर्डब्रेक ठरले आणि टी-सीरिज हे नाव घराघरात पोहोचले. आज टी-सीरिज ही भारतातील सर्वात मोठी संगीत कंपनी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे, तिच्याकडे जगातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेले YouTube चॅनेल देखील आहे.
संगीतानंतर चित्रपट निर्मितीमध्येही 'राज'
गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर भूषण कुमार यांनी वडिलांचा वारसा केवळ जपला नाही, तर तो अनेक पटीने वाढवला. टी-सीरिज आता केवळ संगीत क्षेत्रापुरतं मर्यादित नसून चित्रपट निर्मितीमध्येही ओळख निर्माण केली.'भूल भुलैया ३' आणि 'तू झुठी मैं मक्कर' यांसारखे अलीकडील सुपरहिट चित्रपट टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार झाले आहेत.
इतर प्रमुख कुटुंबांची संपत्ती
भूषण कुमार यांच्या कुटुंबानंतर यशराज फिल्म्सचे मालक असलेले चोप्रा हे श्रीमंतीच्या बाबतीत कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे. आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांची एकूण संपत्ती अंदाजे ८,००० कोटी आहे. अमिताभ बच्चन यांचे कुटुंब अंदाजे ४,५०० कोटींच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कपूर कुटुंबाची एकूण संपत्ती, ज्यामध्ये करीना कपूर खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सारखे स्टार आहेत, सुमारे २००० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.