Masoom Sawal Controversy : ‘मासूम सवाल’चं पोस्टर वादाच्या भोवऱ्यात; सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्णाचा फोटो, FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:24 IST2022-08-08T11:24:15+5:302022-08-08T11:24:49+5:30
Masoom Sawal Controversy : चित्रपटाच्या पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

Masoom Sawal Controversy : ‘मासूम सवाल’चं पोस्टर वादाच्या भोवऱ्यात; सॅनिटरी पॅडवर भगवान श्रीकृष्णाचा फोटो, FIR दाखल
Masoom Sawal Controversy : हिंदी चित्रपट मासूम सवाल सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय. चित्रपटाच्या पोस्टरवर सॅनिटरी पॅडवर दाखवण्यात आलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या फोटोमुळे आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आता हे प्रकरण पोलिसांत गेलं असून मासूम सवालचे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याविरोधात एफआयदेखील दाखल झाला आहे.
मासूम सवाल या चित्रपटाच्या पोस्टरवर सॅनिटर पॅडवर भगवान श्रीकृष्णाचा फोटो असल्यानं धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार मिळाली. यानंतर चित्रपटाच्या टीमविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित राठोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय, त्यांची कंपनी आणि संपूर्ण टीमविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. आयपीसीच्या कलम २९५ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती साहिबाबाद सर्कलचे अधिकारी स्वतंत्र सिंह यांनी दिली.
दरम्यान, हिंदू राष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते साहिबाबाद आणि गाझियाबाद येथील चित्रपटगृहांच्या बाहेर आंदोलन करतील, असा इशारा राठोर यांनी दिला. यानंतर पोलिसांकडून चित्रपटगृहाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मासूम सवाल हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला असून मासिक पाळीबद्दल जागरुकता निर्माण करणं यामागील उद्देश असल्याचं सांगण्यात आलंय.