पहिलं लग्न मोडलं, दुसऱ्यांदा संसार थाटायला घाबरलेली अभिनेत्री? २६ वर्षानंतर सांगितल्या 'त्या' कटू आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:25 IST2026-01-07T14:19:10+5:302026-01-07T14:25:10+5:30
पहिल्या लग्नात भावनिक छळ? नातं ठरलं वेदनादायी! घटस्फोटाच्या २६ वर्षानंतर शेफाली शाह झाली व्यक्त

पहिलं लग्न मोडलं, दुसऱ्यांदा संसार थाटायला घाबरलेली अभिनेत्री? २६ वर्षानंतर सांगितल्या 'त्या' कटू आठवणी
Shefali Shah: अभिनेत्री शेफाली शाह हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. 'दिल्ली क्राइम','डार्लिंग्ज' आणि 'थ्री ऑफ अस' असे गाजलेले चित्रपट आणि वेब सीरिजमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आपल्या व्यावसायिक जीवनात शेफाली प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे.मात्र, तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे.शेफालीचा पहिला घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर तिने विपुल शाह यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.
शेफाली शाहने १९९४ मध्ये अभिनेता हर्ष छायासोबत लग्न केलं होतं.परंतु, काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात कटुता आली. लग्नाच्या सहा वर्षांनंतर, २००० मध्ये शेफाली आणि हर्ष यांनी घटस्फोट घेतला. नुकत्याच झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने त्या कठीण काळावर भाष्य केलं आहे. यावेळी ती म्हणाली, आयुष्य परिपूर्ण वाटावं यासाठी तुमच्या आयु्ष्यात नवरा,बहीण किंवा मित्र असावेत, हे गरजेचं नाही. मला याबद्दल कोणी सांगितलं नाही. तुम्ही स्वत: देखील पूरिपूर्ण असता. त्यामुळे, तुमचं नातं जर चांगलं असेल, तर ते उत्तमच आहे. पण जर नातेसंबंध चांगले नसतील तर त्यामुळे तुमची किंमत कमी होईल असं काहीही नसतं. जेव्हा तुम्ही आयुष्यात अनेक चढ-उतारांची सामना करता, तेव्हा तुम्हाला स्वतःच त्याची जाणीव होते."
यानंतर शेफाली म्हणाली," आयुष्यात अशीही एक वेळ अशी येते, जेव्हा तुम्ही पूर्णपणे कोलमडून जाता.पण, हे कदाचित दररोज घडत असूनही ते समजायला एक ठराविक वेळ यावी लागते. अचानक मग एक क्षण असा येतो, जेव्हा तुमच्या लक्षात येतं की, ठीक आहे. यापुढे जर मी हे वारंवार सहन केलं तर यामुळे माझ्या जीवावर बेतू शकतं. मी आता सहन करणार नाही. "
या मुलाखतीमध्ये शेफाली शाहने पूर्वाश्रमीचा पती हर्षसोबतचं घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल सांगितलं. दरम्यान, अभिनेत्री म्हणाली,"मला आठवतंय, माझ्या एका खूप चांगल्या मैत्रिणीने मला विचारलं होतं,जर तुला पुढे तुझ्या आयुष्यात कोणीच भेटलं नाही तर? किंवा जर तुम्हाला संधी मिळाली, तर तू एकटं राहणं पसंत करशील की अशा नात्यात अडकून राहशील? आणि मी म्हणाले, 'नाही, मी ती जोखीम पत्करेन. जर मला माझं उर्वरित आयुष्य एकटीनेच जगावं लागलं तरी मी ते जगेन.पण मी अशा ठिकाणी राहू शकत नाही, जिथे मला आनंद मिळत नाही, जिथे मी आत्मविश्वासाने वावरू शकत नाही." असं मत शेफालीने मुलाखतीत मांडलं. नंतर तिने तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला आणि घटस्फोटानंतर ती बराच काळ एकटी राहिली होती.