"...तर तुमचा चित्रपट बरबाद होईल", राणी मुखर्जीच्या डेब्यू चित्रपटासाठी आईचा होता विरोध, थेट निर्मात्यांना दिलेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:59 IST2025-10-03T12:51:03+5:302025-10-03T12:59:42+5:30
राणी मुखर्जीच्या डेब्यू चित्रपटासाठी आईचा होता विरोध, थेट निर्मात्यांनी दिलेली तंबी, काय घडलेलं?

"...तर तुमचा चित्रपट बरबाद होईल", राणी मुखर्जीच्या डेब्यू चित्रपटासाठी आईचा होता विरोध, थेट निर्मात्यांना दिलेला इशारा
Rani Mukerjee:बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारुन आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी.बॉलिवूडची 'बबली गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.राणी मुखर्जीने १९९७ मध्ये आलेल्या ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिवर फारसा चालला नाही पण, या चित्रपटानंतर तिच्या करिअरला कलाटणी मिळाली. मात्र, या चित्रपटात राणीला कास्ट करू नये, असं तिच्या आईने निर्मात्यांना सांगितलं होतं. यामागे काय कारण होतं, जाणून घेऊया...
अलिकडेच, राणी मुखर्जीने एएनआयशी बोलताना तिच्या पदार्पणाच्या चित्रपटासंबंधित एक किस्सा शेअर केला. याचदरम्यान, ती म्हणाली, "तू आधी स्क्रिन टेस्ट दे मग पुढे काय होतं ते पाहू, असं आईने सांगितलं. पण, स्क्रिन टेस्ट पाहिल्यानंतर आईला त्यामध्ये मी आवडले नाही. त्यानंतर तिने निर्माते सलीम अख्तर यांना मला चित्रपटात कास्ट करू नये,असं सांगितलं. जर तुम्ही तिला चित्रपटात कास्ट केलं तर तुमचा चित्रपट बरबाद होईल. तुमचं नुकसान होईल. त्यापेक्षा तुम्ही तिला कास्ट न केलेलं बरं. परंतु, निर्मात्यांना मला चित्रपटात कास्ट करायचं होतं. त्यामुळे सलीम अंकल यांनी माझं नाव फायन केलं."
त्यानंतर राणी मुखर्जीने या चित्रपटाबद्दल तिच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितलं. त्याविषयी सांगताना तिने म्हटलं,"ते फार आनंदी नव्हते, कारण त्याकाळी ज्यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध होता त्यांच्याच कुटुंबातील मुलं या क्षेत्रात होती. मुली फारशा या क्षेत्रात नसत. शिवाय त्यावेळेस अभिनय क्षेत्र हे करिअर म्हणून चांगला पर्याय असू शकेल असं मानलं जात नसे."असा खुलासा अभिनेत्रीने या मुलाखतीमध्ये केला.
दरम्यान,राणी मुखर्जीने 'राजा की आएंगी बारात' या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. अशोक गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटात राणीसह शादाब खान, मोहसिन बहल, गुलशन ग्रोवर असे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात राणी मुखर्जीने माला नावाच्या एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती.