"जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर...", जान्हवी कपूरने सांगितली श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतरची परिस्थिती, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:39 IST2025-12-01T16:34:01+5:302025-12-01T16:39:46+5:30
"आईचं निधन झालं तेव्हा...", जान्हवी कपूरने सांगितला कठीण काळ, म्हणाली-"काही लोकांनी..."

"जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर...", जान्हवी कपूरने सांगितली श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतरची परिस्थिती, म्हणाली...
Janhvi Kapoor: आजवर अनेक कलाकारांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातील एक लोकप्रिय असं नाव म्हणजे जान्हवी कपूर. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवीने शशांक खैतान यांच्या धडक चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली. या चित्रपटानंतर जान्हवीने मागे वळून पाहिलं नाही. दरम्यान, धडक च्या प्रदर्शनापूर्वीच श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या आईच्या निधनावेळी जान्हवी फक्त २० वर्षांची होती. श्रीदेवी यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब खचलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी कपूरने आई गेल्यानंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
अलिकडेच जान्हवीने मोजो स्टोरीसोबत संवाद साधला.या दरम्यान, श्रीदेवी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले होते. शिवाय काही गोष्टींबद्दल अनावश्यक चर्चा देखील झाल्या. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली," माझ्या आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल मी शब्दांतही सांगू शकत नाही. जर मी काय बोलले तर लोक त्याचा काय अर्थ काढतील माहित नाही. लोकांना माझी दया यावी म्हणून मी असं बोलते, असं वाटेल. त्यामुळे अशा गोष्टींवर बोलणं टाळत असते."
पुढे जान्हवी म्हणाली," मला माहिती आहे प्रत्येकाला हेडलाईन हवी असते. त्यामुळे मला नाही वाटत की माझ्या आयुष्यातील वेदनादायी गोष्टींवर चर्चा व्हावी, हे मला मान्य नाही. त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीवर व्यक्त होणं टाळते."
आईच्या निधनानंतरच्या कठीण काळाबद्दल जान्हवी म्हणाली...
"आईचं निधन झालं तो काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर काय वाटतं याची कल्पनाच कोणी करू शकत नाही.त्यावेळी काही लोकांनी मीम्स बनवले. हे खूप निराशाजनक आहे. मला काहीच कळत नव्हतं. मला वाटतं या गोष्टी पुढेही होत राहतील. कारण, आपणच लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज देत या लोकांना प्रोत्साहन देतो. हे खूपच वाईट आहे, लोकांमध्ये माणुसकीच राहिली नाही. "
जान्हवी म्हणाली," त्यावेळी मला टीव्ही पाहण्याची देखील परवानगी नव्हती. पण, तरीही काही गोष्टी माझ्यापर्यंत येत होत्या. एक मुलगी म्हणून माझ्यासाठी हे खूप वेदनादायक होतं. मला नाही वाटत की त्या गोष्टी मी कधी विसरू शकेन. माझा कोणावर राग नाही, पण एक समाज म्हणून आपण कसे बदलतोय यावर विचार करण्याची गरज आहे." असं मत जान्हवीने व्यक्त केलं.